पाकिस्तानी लष्कराकडून दोन भारतीय जवानांची हत्या करण्यात आल्याच्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडिया साईट्सवरून असंख्य भारतीयांनी या घटनेचा तीव्र निषेध करतानाच पाकिस्तानला धडा शिकविण्याची मागणी केली आहे. विविध राजकीय पक्षांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. शेजारी देशाशी व्यवहार करताना यापुढे लक्ष्मणरेषा निश्चित करावी, अशी मागणी काँग्रेस आणि भाजपने केली आहे. दरम्यान, संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅण्टनी यांनी राजीनामा द्यावा आणि भारताने पाकिस्तानच्या कृत्याचा सडेतोड जबाब द्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
या हल्ल्याबाबत भारताने आंतरराष्ट्रीय समुदायासमोर सर्व वस्तुस्थिती मांडावी त्यामुळे जगभरात पाकिस्तानची मान शरमेने खाली जाईल, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी म्हटले आहे. दोघा भारतीय जवानांना ज्या पद्धतीने ठार करण्यात आले त्यावरून या हल्ल्यामागील खरी भूमिका स्पष्ट होत आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, पाकिस्तानने भारताच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते रशीद अल्वी यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानने जे कृत्य केले ते दुर्दैवी आहे. आता भारताच्या सहनशीलतेची परिसीमा झाली आहे, असेही अल्वी म्हणाले. माहिती आणि प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाकपनेही या कृत्याचा निषेध केला आहे.
दिवसभरातील घडामोडी
सकाळी (१०.३५ ते ११.५५)
* भारतीय सैनिकांच्या हत्येची घटना अमानवी आणि अत्यंत प्रक्षोक्षक असल्याचे संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांचे प्रतिपादन.
* पाकिस्तानचे उच्चायुक्त सलमान बशीर यांना बोलावले. भारताकडून तीव्र निषेध व्यक्त.
* पाकिस्तानी लष्कराकडून हल्ल्याचा इन्कार. भारतावरच प्रतिआरोप. परराष्ट्र मंत्रालयाकडून इन्कार.
* भारतातील सर्व पक्षांकडून हत्येचा तीव्र निषेध.
* कारगिलचे शहीद कॅप्टन सौरभ कालिया यांच्या मृत्यूनंतर भारताने कारवाई केली असती, तर हा प्रकार घडला नसता. कॅ. कालिया यांच्या वडिलांची प्रतिक्रिया.
* गेल्या रविवारी हाजी पीर भागात कथितरीत्या झालेल्या पाकी सैनिकाच्या हत्येचा बदला म्हणून पाकिस्तानी बॉर्डर अॅक्शन टीमने भारतीय जवानांची हत्या केल्याचा दावा.
दुपारी (१२.०० ते ४.००)
* संरक्षणमंत्री ए. के. अँटनी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांच्याकडून पंतप्रधानांना घटनेचे ब्रिफिंग.
* पाकिस्तान आमच्या सहनशक्तीची परीक्षा पाहत आहे – काँग्रेस नेते रशीद अल्वी यांची गर्भित धमकी.
* परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानकडे निषेध नोंदविला. आंतरराष्ट्रीय नियम-अटींनुसार घटनेच्या चौकशीची मागणी.
* आम्ही हे प्रकरण चिघळू देणार नाही – परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांचे वक्तव्य.
* पाकिस्तान कोणत्याही त्रयस्थ चौकशीस तयार – पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांचे प्रतिपादन.
* पाकिस्तानने कितीही इन्कार केला, तरी या घटनेत पाकिस्तानचाच हात असल्याचे संरक्षणमंत्री अँटनी यांचे ठाम प्रतिपादन.

पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधी भंगाच्या घटना
२०१० – ४४
२०११ – ५१
२०१२ – ७१
१ डिसेंबर २०१२ पासून आजतागायत – १२
(यातील बहुसंख्य घटना राजौरी, उरी आणि केरन क्षेत्रात घडल्या आहेत. पाकिस्तानी घुसखोरांना साह्य़ करण्यासाठी पाक लष्कर असे प्रकार करीत असते.)