दिल्लीत चालत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार करणा-या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी राजधानी दिल्लीत ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत असल्याने आज (सोमवार) नऊ मेट्रो स्थानके बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली मेट्रोने घेतला आहे. तसेच इंडिया गेट परिसरात  प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना व ‘ओबी व्हॅन’ला बंदी घालण्यात आली आहे.  
प्रगती मैदान, मंडी हाउस, पटेल चौक, सेंट्रल सेक्रेटरिएट, उद्योग भवन, खान मार्केट, रेस कोर्स, राजीव चौक आणि बाराखंबा मेट्रो स्थानके आज बंद ठेवण्यात येणार आहेत. दिल्ली पोलिसांच्या आदेशानुसार दिल्ली मेट्रोने ही स्थानके बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडल्यानंतर काल (रविवार) सात मेट्रो स्थानके बंद ठेवण्यात आली होती.  
राजधानी दिल्लीला पोलिस छावणीचे स्वरूप आले असून इंडिया गेटकडे जाणारे सर्व रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. तसेच सरकारी कर्मचा-यांना केवळ ओळखपत्र दाखविल्यानंतरच या परिसरात जाण्यास परवानगी देण्यात येत आहे.