बलात्काराच्या आरोपांखाली तुरूंगात असलेल्या स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापू याच्याविरुद्ध साक्ष देणाऱ्या आणखी एका साक्षीदारावर शुक्रवारी हल्ला करण्यात आला. आसाराम यांच्याविरुद्धच्या खटल्यातील साक्षीदारावर हल्ला होण्याची ही सातवी घटना आहे. लखनऊ येथे राहणारे कृपाल सिंग शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास मोटरसायकलवरून आपल्या घरी जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या मोटरसायकलवरील अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांकडून कृपाल सिंग यांच्या मणक्याजवळ गोळी रुतून बसल्याची माहिती देण्यात आली. पेशाने एलआयसी एजंट असणारे कृपाल सिंग यांनी काही दिवसांपूर्वी आसाराम यांच्याविरुद्ध साक्ष दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आसाराम बापू यांच्यावर २०१३ साली जोधपूर येथील आश्रमात एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर संबंधित मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. कृपाल सिंग हे याप्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार असून, साधारण तीन महिन्यांपूर्वी त्यांची साक्ष नोंदविण्यात आली होती. त्यानंतर त्यांना धमकीचे फोन येत असल्याची माहिती बलात्कारित मुलीच्या वडिलांनी दिली. आसाराम बापू आणि त्यांचा मुलगा नारायण साई यांना डिसेंबर २०१३मध्ये सुरत येथील आश्रमात दोन बहिणींवर बलात्कार केल्याप्रकरणी तुरूंगात पाठविण्यात आले होते.