ख्रिश्चन धर्माबद्दल जाणून घेण्याच्या बहाण्याने एका ख्रिश्चन धर्मगुरूच्या घरात शिरून त्याच्यावर तिघा संशयित इस्लामी दहशतवाद्यांनी हल्ला करण्याची घटना घडली आहे. सुदैवाने या हल्ल्यातून हा धर्मगुरू बचावला आहे.
इसिसने काही दिवसांपूर्वीच दोघा परदेशी नागरिकांची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर आता धर्मगुरूवर हल्ला करण्यात आला आहे. फेथ बायबल चर्चचे ल्युक सरकेर (५२) यांच्यावर सोमवारी तिघांनी प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला आणि त्यांच्याच घरात गळा चिरण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी सांगितले.
ख्रिश्चन धर्माबद्दल जाणून घेण्याचा बहाणा करून २५-३० वर्षे वयोगटातील हल्लेखोर पाबना जिल्हय़ातील धर्मगुरूच्या घरात शिरले. हल्लेखोरांनी हल्ला करताच धर्मगुरूंनी मदतीसाठी आरडाओरड केली तेव्हा हल्लेखोर त्यांची दुचाकी तेथेच टाकून पसार झाले. धर्मगुरू जखमी झाले आहेत.
याबाबत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. देशात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याच्या कटाचाच हा एक भाग असल्याचा पोलिसांचा संशय असून त्या दिशेने तपास सुरू करण्यात आला आहे.