दक्षिण दिल्लीत वसंत विहार भागात एका ख्रिश्चन शाळेत अज्ञात व्यक्तींच्या गटाने पहाटेच्या वेळी हल्ला करून मोडतोड केली. दरम्यान ख्रिश्चन आस्थापनांवर तीन महिन्यात झालेला हा सहावा हल्ला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे पोलिस आयुक्त बी.एस.बस्सी यांना बोलावून त्यांना या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.

पोलिसांनी सांगितले, की शाळेतील प्राचार्याच्या कार्यालयात नासधूस करण्यात आली. होली चाइल्ड ऑक्सिलियम स्कूल या शाळेत ही घटना घडली. त्यानंतर शाळा बंद करण्यात आली व विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले. या वेळी टोळक्याने सीसीटीव्ही फोडण्याचा प्रयत्न केला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की या प्रकरणी आम्ही सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी करीत आहोत. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी गेले व त्यांनी पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला. जानेवारीत काही अज्ञात व्यक्तींनी वसंत कुंज येथे चर्चची मोडतोड केली होती. त्यानंतर ख्रिश्चन समाजाने या हल्ल्याचा निषेध केला होता. दिल्लीचे नियोजित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शाळेवरील हल्ल्याचा निषेध केला आहे.
मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी या शाळेच्या माजी विद्यार्थिनी असून त्यांनी होली चाईल्ड ऑक्सिलियम शाळेला दुपारी भेट दिली. नंतर त्या उदयपूरला आयआयएमच्या उद्घाटनासाठी रवाना झाल्या. शाळेचे प्राचार्य श्रीमती इराणी यांच्याशी बोलले व नंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनाही त्यांनी दूरध्वनी केला. दिल्ली पोलिस याप्रकरणी चौकशी करीत असून मनुष्यबळ विकास मंत्रालय त्यांच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहे असे सूत्रांनी सांगितले.