युद्धग्रस्त सिरियातून ग्रीसमध्ये परतताना नाव उलटून झालेल्या अपघातात लहानग्याने जगाचा निरोप घेतला. या लहानग्याचे समुद्रकिनाऱ्यावरील मृतावस्थेतील छायाचित्र जगभरात प्रसिद्ध झाल्यावर सिरियातील निर्वासितांच्या प्रश्नांकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे.
इंग्लंडने सिरियाच्या सीमारेषेवर निर्वासितांच्या आश्रयासाठी निवारा केंद्र उभारले आहे. याच निवारा केंद्रात आश्रयासाठी जात असताना समुद्रात नाव उलटली. या घटनेनंतर तीनवर्षीय आयलान कुर्दी याचा मृतदेह तुर्किस्तानच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडल्याने खळबळ उडाली. या लहानग्याच्या मृत्यूने निर्वासितांच्या प्रश्नांबाबत ठोस भूमिका घेण्याबाबत राजकीय नेत्यांवरील दबाव वाढला आहे, असे इंग्लंडने स्पष्ट केले आहे.
आयलानचे वडील अब्दुल्ला कार्दी म्हणाले की, समुद्रातील प्रवासात नाव उलटल्याने आयलान आणि त्याचा मोठा भाऊ घालेब हे दोघेही हातातून पडले. आयलानच्या आईचाही या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती अब्दुल्ला यांनी दिली. ते म्हणाले की, वडिलांना मुलाशिवाय या जगाकडून कसलीही अपेक्षा नसते. आयलान याला आणि पत्नीला गमावल्याच्या तीव्र यातना होत आहेत. कुर्दिस्तानचे सैनिक आणि इसिसच्या दहशतवाद्याच्या युद्धांमुळे आमचे आयुष्यच उद्ध्वस्त झाले आहे. युरोपियन राष्ट्रांचे उच्च आयुक्त आन्तोनिओ गटर्स यांनी युरोपातील परिस्थिती गंभीर होत असल्याचे स्पष्ट केले आहे. आयलानच्या निधनामुळे तातडीने दोन लाख निर्वासितांना आश्रय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
दुसऱ्या महायुद्धानंतर आता युरोपातील निर्वासितांचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीत लाखो निर्वासितांना सीमारेषा ओलांडाव्या लागल्या होत्या. यामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला होता. लाखो जणांचे बळी घेणाऱ्या दुसऱ्या महायुद्धनंतर सध्या निर्वासितांनी युरोपमध्ये मोठी चळवळ उभारली आहे. दहशतवादी घटनांमुळे युरोपातील हंगेरी, पोलंड, स्लोव्हाकिया आणि झेक रिपब्लिक या देशांच्या नेत्यांनी निर्वासितांच्या या प्रश्नांबाबत नुकतीच चर्चा केली.
अनेक निर्वासितांना सीमा रेषा ओलांडताना प्राण गमवावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ओरबान यांनी निर्वासितांच्या भावना आम्हाला समजत आहेत. मात्र, त्यांनी बेकायदेशीररीत्या सीमारेषा ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन ओरबान यांनी केले आहे. बल्गेरिया आणि तुर्की या देशांनीही निर्वासितांना सीमारेषा न ओलांडण्याचे आवाहन केले आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत निर्वासितांचे मृतदेह किनारपट्टय़ांवरही आढळून येत आहेत. त्यामुळे परिस्थिती गंभीर असल्याचेच चित्र आहे.