करदात्यांकडून कर वसूल करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा, अशी सूचना केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मंगळवारी देशातील महसूल अधिकाऱयांना केली. 
केंद्रीय उत्पादनशुल्क आणि सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱयांशी संवाद साधताना चिदंबरम यानी ही सूचना केली.
देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चालू वित्तीय वर्ष हे मोठ्या आव्हानाचे ठरले आहे. एकाबाजूला उत्पादनात घट झाली आहे आणि त्याचवेळी आयातही घटली आहे. त्यामुळे अपेक्षित महसूल गोळा करण्यासाठी अधिकारय़ांना प्रयत्न करण्याची गरज असल्याचे चिदंबरम यांनी स्पष्ट केले.
२०१२-१३ हे वित्तीय वर्ष संपण्यास आता अवघे काही आठवडे शिल्लक आहेत. त्यामुळे निर्धारित महसुली उत्पन्न मिळवण्यासाठी अधिकाऱयांनी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत. केंद्र सरकारने चालू वित्तीय वर्षात अप्रत्यक्ष करांद्वारे साडेपाच लाख कोटी रुपयांचे महसुली उत्तन्न मिळवण्याचे ठरविले होते. गेल्या वित्तीय वर्षापेक्षा त्यामध्ये २७ टक्क्यांची वाढ गृहीत धरण्यात आली होती. आर्थिक मंदीसदृश्य स्थिती असताना एप्रिल ते नोव्हेंबर याकाळात त्यामध्ये १६.८ टक्क्यांचीच वाढ झाली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.