तुलसी गब्बार्ड यांनी अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहामध्ये निवडून येणाऱ्या पहिल्या हिंदूधर्मीय सभासद म्हणून मान मिळवला असतानाच, अमेरिकेच्या कॉंग्रेसमध्ये भगवद्गीता या हिंदूंच्या पवित्र धर्मग्रंथावर हात ठेवून खासदारकीची शपथ घेणाऱ्याही त्या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत.
३१ वर्षीय तुलसी यांना प्रतिनिधीसभेचे सभापती जॉन बॉनेर यांनी शपथ दिली. माझे राष्ट्र आणि माझे देशबांधव यांना सेवा देण्याची शिकवण मला भगवद्गीतेतून मिळाली, असे तुलसी यांनी सांगितले.
माझे आयुष्य जनसेवेसाठी वेचण्याची प्रेरणा मला ज्या ग्रंथाने दिली, त्याचीच प्रत हाती घेऊन मी शपथ घेतली असे तुलसी यांनी स्पष्ट केले.
आपल्या श्रद्धास्थानाबद्दल त्या भरभरून बोलल्या. गीता वाचनामुळे मला आयुष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची प्रेरणा मिळत गेली, सर्वत्र गदारोळ माजलेला असतानाही माझे चित्त शांत ठेवण्याची कला मी भगवद्गीतेमुळेच शिकले, असे तुलसी यांनी गीतेवर हात ठेवून शपथ घेण्यामागील कारण सांगताना स्पष्ट केले. आई हिंदू तर वडील कॅथॉलिक ख्रिश्चन असल्याने आपल्यावर दोन्ही धर्मातील उत्तम मूल्यांचे संस्कार झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तुलसी यांनी वयाच्या २१व्या वर्षी हवाई मतदारसंघातून निवडून येत सर्वात तरुण वयात लोकप्रतिनिधी होण्याचा मान मिळवला होता.
वयाच्या २३व्या वर्षी आपल्या पदाचा राजीनामा देत लष्करी सेवेसाठी जाणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या अधिकारी होत्या, तर २८व्या वर्षी कुवेत आर्मी नॅशनल गार्डतर्फे सन्मानित केल्या जाणाऱ्या त्या महिला होत्या.