प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय कात्जू पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप करून त्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने सोमवारी केली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांनी कात्जूंवर केलेल्या टीकेला आणखी धार देण्याचे काम सोमवारी पक्षाच्या प्रवक्त्याने केले.
बिगर कॉंग्रेसी राज्य सरकारांबद्दल आपली मते मांडून कात्जू अकारण वाद निर्माण करीत असल्याचे भाजपचे प्रवक्ते राजीवप्रताप रुडी यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया या वैधानिक संस्थेचे अध्यक्षपद कात्जू सांभाळत आहात. ते देशात विविध ठिकाणी फिरताना अकारण वादग्रस्त वक्यव्ये करताहेत. बिगर कॉंग्रेसी राज्य सरकारांवर टीका कऱण्याला ते प्राधान्य देतात, मग ते पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार असू दे, बिहारमधील नितीशकुमार यांचे सरकार असू दे किंवा गुजरातमधील नरेंद्र मोदी यांचे सरकार असू दे.
जेटली यांनी कात्जूंवर केलेल्या टीकेचे नरेंद्र मोदी यांनीदेखील समर्थन केले असून, त्यांनीही कात्जूंनी राजीनामा द्यावा, असे म्हटले असल्याचे रुडी यांनी सांगितले.