उत्तर प्रदेशातील दादरी येथे गोमांस भक्षण केल्याच्या संशयावरून एकाला ठेचून मारण्यात आल्याच्या घटनेबाबत भाजप राजकारण करत असल्याचा आरोप सत्ताधारी समाजवादी पक्षाने केला आहे, तर या घटनेला धार्मिक रंग देऊन समाजवादी पक्ष मतांचे ध्रुवीकरण करत असल्याचा प्रत्यारोप भाजपने केला आहे. दरम्यान, या घटनेच्या दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले असून, मृताच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने ४५ लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या आमंत्रणावरून मयत मोहम्मद इखलाकची आई असगरी, भाऊ मोहम्मद अफझल व मुलगी शाइस्ता यांनी त्यांची रविवारी लखनौमध्ये भेट घेतली. यादव यांनी या कुटुंबीयांना न्याय मिळेल असे आश्वासन देतानाच, आपला पक्ष या घटनेचे कधीही राजकारण करणार नाही यावर भर दिला. मृत इखलाकच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून यापूर्वी जाहीर करण्यात आलेली २० लाखांची रक्कम वाढवून ३० लाख रुपये केल्याची, तसेच त्याच्या तीन भावांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली.
समाजवादी पक्ष या घटनेचे राजकारण कधीच करणार नाही, असे या घटनेवरून टीकेचा भडिमार सहन करावा लागलेले मुख्यमंत्री यादव म्हणाले. आमचे सरकार सत्तेवर आल्यापासून काही लोक आमच्याविरुद्ध वातावरण बिघडवत असल्याचा आरोप त्यांनी केला.दरम्यान, दादरी येथील घटनेला समाजवादी पक्ष धार्मिक रंग देत असल्याचा थेट आरोप भाजपने केला.