काळा पैसा जाहीर करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत ३,७७० कोटी जमा झाले आहेत. केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून गुरूवारी याबद्दलची माहिती जाहीर करण्यात आली. या एक खिडकी योजनेच्या माध्यमातून ६३८ जणांनी सरकारकडे त्यांच्या काळ्या पैशाचा तपशील जाहीर केल्याचे अर्थमंत्रालयाकडून सांगण्यात आले. काळा पैसा जाहीर करण्यासाठी सरकारने १ जुलैपासून तीन महिन्यांची एक खिडकी मुदत योजना जाहीर केली होती. या जाहीर केलेल्या बेहिशेबी संपत्तीवर व पैशांवर ३० टक्के कर आणि तेवढीच रक्कम दंड म्हणून भरावी लागणार होती. गेल्या मे महिन्यात संसदेने काळ्या पैशांविरुद्धचा नवा कायदा संमत केला व त्याला २६ मे रोजी राष्ट्रपतींनी मान्यता दिली. या कायद्यांतर्गत ही एक खिडकी योजना जाहीर करण्यात आली होती. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या काळा पैसा धारकांना आॅनलाईन फायलिंग आणि टपालाद्वारे संबंधित दस्तावेज सरकारकडे पाठविण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. दरम्यान, बेकायदा, काळा पैसा दिलेल्या मुदतीत (३० सप्टेंबर) जाहीर न केल्यास कायद्यानुसार कारवाई होईल, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (सीबीडीटी) सांगण्यात आले होते.