न्यू होरायझन्स यानाचे निष्कर्ष
प्लुटोच्या वातावरणाची पहिली रंगीत छायाचित्रे नासाच्या न्यू होरायझन्स यानाने पाठवली असून त्यात बर्फाळ बटू ग्रहावर निळे आकाश दिसत आहे. प्लुटोच्या पृष्ठभागावर बर्फ दिसत आहे.
कोलोरॅडोतील साऊथवेस्ट रीसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थेचे प्रमुख संशोधक अ‍ॅलन स्टर्न यांनी सांगितले की, कुईपर पट्टय़ातील या बटू ग्रहावर एरवी कुणी निळ्या आकाशाची कल्पनाही केली नसेल.
तेथील बर्फाळ धुक्याच्या कणांना राखाडी किंवा लाल रंग आहे, पण ज्या पद्धतीने ते निळा रंग पसरवतात त्यामुळे न्यू होरायझन्स मोहिमेचे वैज्ञानिक चकित झाले आहेत. एसडब्ल्यूआरआय या संस्थेचे संशोधक कार्ली हॉवेट यांच्या मते त्या निळ्या रंगातून आपल्याला धुक्याच्या सदृश कणांची व्याप्ती व संरचना कळू शकते.आकाश हे काही लहान कणांनी नेहमी सूर्यकिरण विखुरले गेल्याने निळे दिसते. पृथ्वीवर नायट्रोजनच्या लहान रेणूंनी सूर्यकिरण पसरले जाऊन आकाश निळे दिसते, तर प्लुटोवरही आकाश काजळीसारख्या थोलिन या कणांमुळे निळे दिसते. वैज्ञानिकांच्या मते प्लुटोच्या वातावरणातील अगदी वरच्या थरात थोलिनचे कण असतात तेथे अतिनील किरणांचे विघटन होते व त्यातून नायट्रोजन व मिथेनचे रेणू तयार होतात. ते एकमेकांशी अभिक्रिया करतात. त्यामुळे धन व ऋणभारित आयन तयार होतात.
ते पुन्हा एकत्र आल्यानंतर स्थूलरेणू तयार होतात. अशी क्रिया शनीचा चंद्र असलेल्या टायटन या उपग्रहावर दिसून आली आहे. अधिक गुंतागुंतीचे रेणू एकत्र येऊन त्याचे छोटे कण बनतात. अस्थिर वायूंचे संघनन होते व ते त्या कणांच्या पृष्ठभागावर बसतात त्यामुळे बर्फाचे कण असल्यासारखे धुके दिसते, त्यामुळे प्लुटोच्या लालसर रंगातही भर पडते. न्यू होरायझन्स यानाने केलेल्या संशोधनानुसार प्लुटोच्या अनेक भागात बर्फ आहे. राल्फ स्पेक्ट्रल कंपोझिशन मॅपरने ते शोधले आहे. प्लुटोच्या विस्तारित भागात सरसकट बर्फ दिसत नाही, कारण तिथे अतिशय तरल अशा बर्फाचे थर आहेत. तेथे काही ठिकाणी पाणी आहे व इतर ठिकाणी नाही याचे कारण शोधावे लागेल, असे जॅसन कुक यांनी सांगितले. रंगीत छायाचित्रात जिथे लाल रंग दिसतो आहे तिथे पाण्याचे बर्फ दिसते. ते लालसर दिसते हे बघून आश्चर्य वाटते, असे मेरीलँड विद्यापीठाच्या सिल्विया प्रोटोपापा यांनी सांगितले. पाण्याचे बर्फ व लाल रंगाचे थोलिन कण प्लुटोच्या पृष्ठभागावर आहेत. न्यू होरायझन्स अवकाशयान पृथ्वीपासून ५ अब्ज किलोमीटर दूर आहे, त्यातील सर्व प्रणाली व्यवस्थित काम करीत आहेत.