बीएसएनएल ग्राहकांसाठी खूशखबर आहे. येत्या १५ जूनपासून बीएसएनएल ग्राहकांना राष्ट्रीय रोमिंग सेवा विनामूल्य वापरता येईल. केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही घोषणा केली. याशिवाय जुलैपासून राष्ट्रीय क्रमांक पोर्टबिलिटी सेवा देशभरात लागू होईल. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांत स्थलांतर करणाऱ्यांना मोबाइल क्रमांक बदलावा लागणार नाही.
रविशंकर प्रसाद म्हणाले की, दूरसंचार क्षेत्रात बीएसएनएलने क्रांती आणली. स्मार्ट फोन्सच्या वापरामुळे लॅण्डलाइन ग्राहक कमी झाले. बीएसएनएलच्या सेवेत सुधारणा करण्यासाठी कॉल ड्रॉप समस्या निकाली काढण्यासाठी गांभीर्याने विचार सुरू आहे. सर्व खासगी दूरसंचार कंपन्यांनीही ही समस्या सोडवावी, असे त्यांनी आवाहन केले. वर्षभरात बीएसएनएलने १५ हजार टॉवर्सची उभारणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली.