बांदा येथील बलात्कारप्रकरणी बसपाचा माजी आमदार पुरुषोत्तम नरेश द्विवेदी याला येथील सत्र न्यायालयाने दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. यापैकी निम्मी रक्कम पीडितेच्या कुटुंबीयांना भरपाईपोटी देण्याचा आदेश दिला आहे. याच संदर्भात राम नरेश यादव आणि वीरेंद्रकुमार शुक्ला यांनाही न्यायालयाने दोन वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेबरोबरच दोन हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. याखेरीज राजेंद्र शुक्ला व सुरेश नेता यांना न्यायालयाने मुक्त केले आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष न्यायाधीश व्ही. के. श्रीवास्तव यांनी यासंबंधी निकाल दिला. बांदा जिल्ह्य़ातील आतारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० डिसेंबर २०१० रोजी १७ वर्षांच्या एका मुलीवर बलात्कार करण्यात आला. तिने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, या आरोपींनी तिच्याच विरोधात चोरीचा आळ घेऊन गुन्हा नोंदविला.