भारतातील जातीय हिंसाचाराच्या घटना पहिल्या पाच महिन्यांत २०१४च्या तुलनेत २४ टक्के वाढल्या असून, या वर्षांच्या पहिल्या पाच महिन्यांत जातीय हिंसाचारातील मृत्यू गेल्या वर्षीच्या तुलनेत ६५ टक्के वाढले आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाने जी माहिती गोळा केली आहे ती पाहता देशात ३१ मेपर्यंत जातीय हिंसाचाराच्या २८७ घटना घडल्या असून, २०१४ मध्ये हेच प्रमाण २३२ होते. जानेवारी ते मे २०१५ दरम्यान गेल्या वर्षीच्या पहिल्या पाच महिन्यांच्या तुलनेत जातीय हिंसाचाराच्या घटनांतील मृतांची संख्या २६ वरून ४३ झाली. जखमींची संख्या ७०१ वरून ९६१ झाली. जातीय हिंसाचारात वाढ झालेल्या राज्यात उत्तर प्रदेश, हरयाणा, महाराष्ट्र व पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. मोदी सरकारच्या काळात जातीय सलोखा प्रथमच खालावला आहे. २०१३ मध्ये जातीय हिंसाचाराच्या घटना ८२३ होत्या त्या २०१४ मध्ये ६४४ पर्यंत खाली आल्या. २०१३ मध्ये यातील मृत्यूंची संख्या १३३ होती, ती २०१४ मध्ये ९५पर्यंत खाली आली. जखमींची संख्या २०१३ मध्ये २२६९ होती ती २०१४ मध्ये १९६१ झाली. २०१४ मध्ये जातीय हिंसाचार कमी असण्याचे श्रेय मोदी सरकारला देता येणार नाही कारण मे २०१४ पर्यंत यूपीएचे सरकार सत्तेवर होते.