मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्याचे वृत्तसंकलन करणारा एका दूरचित्रवाणी वाहिनीचा पत्रकार अक्षयसिंह याच्या गूढ मृत्यूची चौकशी सीबीआय करीत आहे. अक्षयसिंह याला कोणता आजार होता का आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला का याची शहानिशा करण्यासाठी सीबीआयने बुधवारी त्याच्या कुटुंबीयांकडून अक्षयसिंहचे वैद्यकीय अहवाल ताब्यात घेतले.
सदर वैद्यकीय अहवाल वैद्यकीय मंडळाकडे पाठविण्यात आला आहे. अक्षयसिंह याला कोणता आजार होता का आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला का याची निश्चिती करण्यात येणार आहे, असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. दूरचित्रवाणी वाहिनीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. मात्र चौकशीपूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांच्या अभिप्रायाची प्रतीक्षा करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
व्यापम घोटाळ्यात दामोर ही एक लाभार्थी होती आणि तिच्या पालकांची मुलाखत घेतल्यानंतर अक्षयसिंह त्यांच्याच घरात कोसळला होता. या घोटाळ्याशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध असलेल्या ३५ जणांचा गूढ मृत्यू झाला आहे.