मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या निवासस्थानी तसेच कार्यालयांमध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने छापे टाकले आहेत. त्यांची किंगफिशर एअरलाईन्स ही कंपनी सध्या बंद असली तरी कंपनीच्या पाच कार्यालयांवरही छापे टाकण्यात आले आहेत. आयडीबीआय बँकेकडून मल्ल्या यांनी घेतलेले ९०० कोटी रुपयांचे कर्ज फेडलेले नाही त्या प्रकरणी हे छापे टाकण्यात आले.
सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, मल्ल्या यांच्या मुंबई, गोवा, बंगळुरू व इतर निवासस्थानी छापे टाकण्यात आले. मल्ल्या हे आता चालू नसलेल्या किंगफि शर एअरलाईन्सचे संचालक आहेत. मल्ल्या तसेच त्यांच्या एअरलाईन्स कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी ए . रघुनाथन तसेच आयडीबीआयच्या अज्ञात अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले आहेत. आयडीबीआय बँकेने नियमांचे उल्लंघन करून हे कर्ज मल्ल्या यांच्या एअरलाईन्स कंपनीला मंजूर केले होते. कंपनीने यावर कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
सीब्ीआयच्या सूत्रांनी सांगितले की, या कर्जप्रकरणी गुन्हेगारी दृष्टिकोनातून तपास सुरू आहे कारण अनेक बँकांनी ज्या अनुत्पादक मालमत्ता जाहीर केल्या त्यात थकित कर्जे बरीच आहेत. दरम्यान मल्ल्या यांचे याप्रकरणी जाबजबाब घेतले जाणार असल्याचे समजते. इतर कर्जाचे ओझे असताना बँकेने नियम डावलून कर्ज देणे चुकीचे होते असे सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. कर्जे देण्याची कारणे बँकेला सांगावी लागतील.
अंतर्गत अहवालात हे कर्ज देण्यात येऊ नये असा शेरा मारलेला होता. किंगफिशर एअरलाईन्स कंपनीने २०१२ मध्ये काम बंद केले आहे.

१७ बँकांना फटका
थकित कर्जाबाबत मल्ल्यांच्या कंपनीविरोधात २७ चौकशा चालू आहेत. काही सार्वजनिक बँकांनीही २०१३ मध्ये कंपन्यांना कर्जे दिली होती. १७ बँकांच्या महासंघाचे किमान सात हजार कोटी रुपये किंगफिशरने थकवले असून स्टेट बँक ऑफ इंडियाचे १६०० कोटी रुपये बुडवले आहेत. तत्कालीन सीबीआय संचालक रणजित सिन्हा यांनी सांगितले की, ३० थकित खात्यांशी संबंधित अनेक थकित कर्जे आहेत.