सिडनी : चीनच्या वाढत्या साहसवादाला आव्हान देण्यासाठी अमेरिका व ऑस्ट्रेलियाच्या संयुक्त द्वैवार्षिक युद्ध सरावात जपानही रविवारी प्रथमच सहभागी झाला. गेले दोन आठवडे उत्तरेकडील प्रांत तसेच क्वीनलॅण्ड स्टेट परिसरात युद्ध सराव सुरू असून अमेरिका व ऑस्ट्रेलियाचे सुमारे ३० हजारांहून लष्करी अधिकारी त्यामध्ये सहभागी झाले आहेत. या सरावात न्यूझीलंडच्याही ५०० हून अधिक सैनिकांचा समावेश होता. येत्या २१ जुलैपर्यंत हा सराव चालणार आहे. आर्थिक आणि लष्करी स्तरावर चीनने दंड थोपटले असून दक्षिण चीनच्या समुद्रातील पाण्याच्या वादग्रस्त हद्दीत त्यांनी कृत्रिम बेटांच्या उभारणीस प्रारंभ केला आहे. याखेरीज जपान नियंत्रित सेनकाकू बेटांप्रकरणीही चीनने जपानला आव्हान दिले आहे.