चीन आणि पाकिस्तान यांच्या झालेल्या संरक्षणविषयक करारानुसार चीन पाकिस्तानला आठ पाणबुडय़ांची बाधणी करून देणार असून, त्यापैकी चार पाणबुडय़ांची बांधणी कराचीत करण्यात येणार आहे.
पाणबुडय़ांच्या बांधणीचे काम चीन आणि पाकिस्तानमध्ये एकाच वेळी सुरू होणार आहे, असे संरक्षण उत्पादनमंत्री राणा तन्वीर हुसेन यांनी सांगितले. पाणबुडय़ांच्या बांधणीसाठी चीन पाकिस्तानला तंत्रज्ञान हस्तांतरित करणार आहे.
या कराराच्या अंमलबजावणीमुळे सध्या असलेल्या पाणबुडय़ांशी संबंधित क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. पाकिस्तानच्या नौदलात असलेली अगोस्ता ९०-बी ही पाणबुडी कराची जहाज बांधणी आणि अभियांत्रिकी बांधकाम कारखान्यात २००८ मध्ये बांधण्यात आली आहे.
या पाणबुडय़ांच्या बांधणीचे काम कधी सुरू होणार आहे ते मंत्र्यांनी स्पष्ट केले नाही, लवकरच सुरू होईल, इतकेच ते म्हणाले. यासाठी कराचीमध्ये प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे.
सदर पाणबुडी कोणत्या प्रकारची असेल तेही मत्र्यांनी स्पष्ट केले नाही. तथापि, ही पाणबुडी युआन वर्गवारीतील ०४१ प्रकारची डिझेल-विजेवरील असेल आणि ती एआयपी यंत्रणेने सुसज्ज असेल, असे सांगण्यात येत आहे.