चीनची आर्थिक स्थिती काहीशी खालावल्याने त्याचा फटका भारतालाही बसला आहे, असे रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितले. चीनमधील आर्थिक स्थितीचा भारतावर परिणाम होणार नाही हे सरकारचे म्हणणे त्यांनी फेटाळून लावले.
हाँगकाँग येथील साऊथ चायना मॉर्निग पोस्टला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, की चीनमधील आर्थिक स्थिती मंदावल्याने सगळ्या जगाला चिंता आहे. चीनमध्ये आमची निर्यात असलेल्या वस्तूंना मागणी कमी होत आहे शिवाय अप्रत्यक्षपणे इतरही काही देशांना आम्ही निर्यात करतो, ते लोकही आमचा माल कमी प्रमाणात विकत घेत आहेत. भारत हा आयातदार देशही असल्याने आम्हाला काही स्वस्त वस्तूंचा फायदाही झाला आहे, त्यामुळे जेवढा वाईट परिणाम भारतावर होणे अपेक्षित होते तसा काही झालेला नाही, तरीही र्सवकष विचार केला तर चीनमधील घसरत्या आर्थिक स्थितीचा जगाच्या आर्थिक वाढीवर परिणाम झाला आहे व भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेशी एकात्म म्हणजे जोडलेला असल्याने त्याचा परिणाम भारतावरही झाला आहे.