‘बेटांचा देश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालदीवच्या राजधानीतील पाण्याची गंभीर स्थिती लक्षात घेऊन मोदी सरकारने १२०० टन शुद्ध पाणी पाठवले. त्यानंतर चीननेही भारताच्या पावलावर पाऊल ठेवून विमान आणि जहाजांच्या साहाय्याने एक हजार टन पाणी मालदीवला पाठवले आहे.
माले येथे पाण्याने भरलेल्या बाटल्या पाठवण्यासाठी चीनने आपल्या दोन नागरी विमानांचा वापर केला. शनिवारी सकाळी १२ टन बॉटल माले येथे रवाना करण्यात आल्या. तर शनिवारी रात्री दुसऱ्या विमानात आठ टन पाणी पाठवण्यात आल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र खात्याने दिली. मालदीवमधील नागरिकांना पाण्याचा आणखी पुरवठा केला जाईल, असेही या वेळी सांगण्यात आले. चीनच्या नौदलाने येथील संरक्षण अभियान अचानक रद्द करून पाण्याच्या मदतीसाठी मालदीवकडे कूच केली. मालेच्या बंदरावरून पाण्याचा पुरेसा साठा देण्यात आला. जहाजावर ९६० टन शुद्ध पाणी आणि समुद्राचे खारे पाणी शुद्ध करणारी यंत्रणा जहाजावर बसवण्यात आली होती. हे जहाज सोमवापर्यंत मालेला पोहोचेल, अशी शक्यता आहे. याच वेळी चीनच्या हवाई दलानेही तातडीची मदत यंत्रणा उभारली आहे. संबंधित देशांच्या मदतीने ही मदत मालदीवला पोहोचवली जाईल, असेही चीनच्या लष्कराने नमूद केले.
माले हे शहर हिंदी महासागराजवळील सखल भागात वसलेले आहे. त्यामुळे या शहराला पाण्याचा नैसर्गिक स्रोत नाही. समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाणी तयार केले जाते आणि माले शहरवासीय या पाण्यावर आपली तहान भागवतात. परंतु चार दिवसांपूर्वी ‘मालदीव जल आणि सांडपाणी कंपनी’च्या निर्मिती नियंत्रण प्रकल्पात आग लागून यंत्रणा ठप्प झाल्याने पाणी शुद्धीकरण प्रक्रिया बंद पडली होती. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा बंद पडला होता. त्यामुळे मालदीवने अमेरिका, चीन, भारत आणि श्रीलंकेला पाणीपुरवठय़ासाठी आवाहन केले आहे.