सैन्याच्या संख्येत मात्र तीन लाखांनी कपात
दुसऱ्या महायुद्धात जपानवर मिळवलेल्या विजयाचा सत्तरावा वर्धापन दिन साजरा करण्याच्या निमित्ताने लष्करी सामर्थ्यांचे अभूतपूर्व प्रदर्शन करताना चीनने गुरुवारी त्यांचे लांबपल्ल्यांचे ‘एअरक्राफ्ट कॅरिअर- किलर्स’ आणि अत्याधुनिक शस्त्रांचे प्रदर्शन जगाला घडवले; मात्र याच कार्यक्रमात लष्कराचे संख्याबळ तीन लाखांनी कमी करण्याची अनपेक्षित घोषणाही केली.
शेजारी राष्ट्रांशी भूभागाबाबत कटू वाद सुरू असतानाच दोन कोटी तीन लाख इतक्या प्रचंड संख्येतील चिनी लष्कराने येथील विस्तीर्ण अशा तियानमेन चौकात उत्कृष्ट समन्वयासह केलेल्या प्रदर्शनात आंतरखंडीय क्षेपणास्त्रांपासून मध्यम पल्ल्याच्या बॉम्बर्ससह त्यांची अत्याधुनिक शस्त्रास्त्रे सादर केली.
‘चीन आपल्या सैन्याची संख्या ३ लाखांनी कमी करेल असे मी जाहीर करतो’, असे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यावेळी अनपेक्षितपणे सांगितले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क ग्युन-हे तसेच संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान-की-मून व भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात अध्यक्ष क्षी यांनी दुसऱ्या महायुद्धात झालेल्या अतिरेकाबाबत जपानवर टीका करणे टाळले व या युद्धात ३५ लाखांहून अधिक चिनी लोक मृत किंवा जखमी झाल्याचे सांगितले.
संरक्षणाचे वार्षिक अंदाजपत्रक १४५ अब्ज अमेरिकन डॉलर्स, म्हणजे अमेरिकेनंतर जगात दुसऱ्या क्रमांकाचे असलेल्या चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने नवी शस्त्रे व तंत्रज्ञान यासह सैन्याचे अभूतपूर्व असे आधुनिकीकरण सुरू केले आहे. १९८० नंतर चिनी सैन्याच्या संख्येतील ही चौथी कपात असेल.
१९८५ साली चीनने सैन्याचा आकार आजवर सर्वाधिक संख्येत, म्हणजे १० लाखांपेक्षा कमी केला होता. आता केलेल्या कपातीनंतरही चीनचे सैन्य जगातील सगळ्यात मोठे राहणार असून, चीनच्या गरजा भागवण्यास ते पुरेसे आहे, असे संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते यांग युजुन यांनी सांगितले.
भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी चीनच्या परेडचे वर्णन ‘प्रभावी’ असे केले, परंतु या शस्त्रसामर्थ्यांबाबत आधीच माहिती असल्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटले नाही, असेही ते म्हणाले.
आंतरखंडीय क्षेपणास्त्रे, रणगाडे, ड्रोन्स आणि इतर लष्करी साहित्य हे या परेडचा भाग होते. सुमारे २०० लढाऊ जेट विमानांनी आकाशात झेप घेतली, तसेच ७० हजार कबुतरे व फुगे आकाशात सोडण्यात आले तेव्हा हे सर्व झाकोळून गेले होते. पाकिस्तान व रशियासह १७ देशांमधील १ हजार विदेशी सैनिक सहभागी झालेली आणि दीड तास चाललेली ही परेड सुमारे ४० हजार प्रेक्षकांनी पाहिली.
‘कॅरियर किलर्स’ असे वर्णन करण्यात आलेले ‘डाँगफेंग-२१ डी’ हे जहाजभेदी आंतरखंडीय क्षेपणास्त्र या परेडचे मुख्य आकर्षण होते. १७०० किलोमीटर अंतरावरून विमानवाहक जहाजे उडवून देण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्रांमुळे अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.
दक्षिण चिनी समुद्र व पूर्व चिनी समुद्राच्या मुद्दय़ावर चीनचे शेजारी देशांशी संबंध ताणले गेले असतानाच चीनने लष्करी सामर्थ्यांचे हे अभूतपूर्व प्रदर्शन केले आहे.