सत्तारूढ ‘चीन कम्युनिस्ट पक्षा’तील सर्वोच्च अधिकारस्थान असलेल्या सरचिटणीसपदावर गुरुवारी झी जिनपिंग यांची निवड झाली असून मार्च महिन्यात ते हु शिंताओ यांच्याकडून देशाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता असलेल्या चीनमध्ये दर दहा वर्षांनंतर प्रथेनुसार असे सत्तांतर होते. त्यानुसार आजवर उपाध्यक्षपद सांभाळणारे ५९ वर्षांचे झी हे हु यांची जागा घेतील तर पंतप्रधान वेन जिआबाओ यांच्या जागी ५७ वर्षांचे लि केकियांग यांची नियुक्ती होईल. आठ कोटी सदस्यसंख्या असलेल्या कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीसपद, देशाचे अध्यक्षपद याचबरोबर झी हे २३ लाख सैनिक असलेल्या जगातील सर्वात मोठे लष्कर म्हणून लौकिक असलेल्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’(पीएलए) या सेनादलाचे प्रमुखपदही स्वीकारतील. चीन कम्युनिस्ट पक्षाच्या पाचव्या पिढीकडे सत्तासूत्रे देण्याचा हा सोहळा देशभर दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित झाला.

नवी टीम चीन?
चीनमधील सत्तेवर अंकुश राखणाऱ्या या पॉलिटब्युरोत झी, लि यांच्यासह शँग देजियांग, यु झेन्शेंग, लिउ युन्शान, वांग क्विशान आणि शँग गाओली यांचा समावेश आहे. पॉलिटब्युरोची सदस्यसंख्या नऊवरून प्रथमच सातवर आणण्यात आली असून त्यामुळे नेतृत्व अधिक सुसंघटित व बळकट होण्याची अपेक्षा आहे. कम्युनिस्ट पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर झी यांनी केलेल्या भाषणात भ्रष्टाचार आणि कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची जनतेपासून तुटलेली नाळ, या देशासमोरच्या दोन मोठय़ा समस्या असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. हे प्रश्न सोडविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

झी यांची कारकीर्द ?
ग्रामप्रमुखपदापासून झी यांची राजकीय वाटचाल चालू झाली होती. त्यांचे वडील उपपंतप्रधान होते त्यामुळे कम्युनिस्ट वारसा त्यांच्या रक्तातच आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या शांघाय शाखेचे सचिव म्हणून त्यांनी केलेल्या प्रभावी कार्याची दखल पक्षनेतृत्वाने घेतली होती. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिक्सच्या आयोजनातही त्यांचा मोठा वाटा होता. आता देशाचे नेते म्हणून भ्रष्टाचाराबरोबरच दोन आव्हानांचा सामनाही त्यांना करायचा आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी चीनमध्ये लागू असलेल्या एक अपत्य धोरणामुळे लोकसंख्येतील युवाशक्तीपेक्षा वृद्धांचे प्रमाण वाढले आहे आणि गरीब आणि श्रीमंत या वर्गातील दरी वाढली आहे. या दोन आव्हानांचा मुकाबला झी कसे करणार, याकडेही लोकांचे लक्ष आहे.