लडाखच्या मुद्दय़ास काही प्रमाणात अनुल्लेखाने मारण्याचे संकेत चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ या संघटनेने गुरुवारी दिले. मात्र ‘काही वेळा अशा घटना अपरिहार्यच’ असतात, अशीही पुस्ती त्यांनी जोडली. अर्थात उभय बाजूंनी परिणामकारक प्रयत्न केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, अशी मखलाशीही त्यांनी जोडली.
चीनच्या लष्कराचे प्रवक्ते जेंग यानशेंग यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना उपरोक्त बाबी स्पष्ट केल्या. भारत आणि चीन यांच्यातील सीमेची आखणी झालेली नसल्यामुळे अशा घटना घडणे अपरिहार्य आहे, असे यानशेंग म्हणाले.
सीमेवर अशा प्रकारच्या घटना घडत असतात, हे मान्य करतानाच असे घडत असले तरी भारत आणि चीन यांच्यातील चांगला शेजारधर्म आणि मैत्रीपूर्ण संबंधांवर त्याचा परिणाम होणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. चीनचे सर्वोच्च नेते भारताच्या दौऱ्यावर असतानाच घुसखोरीच्या घटना कशा घडतात, या प्रश्नाला यानशेंग यांनी बगल दिली.