‘झीरो डार्क थर्टी’ या चित्रपटाच्या कथेसाठी हॉलीवूड कथालेखकाला सीआयएचे माजी संचालक लिऑन पेनेट्टा यांनी गुप्त माहिती पुरविली असे पेण्टागॉनने केलेल्या तपासात उघड झाले आहे.पेण्टागॉन महानिरीक्षकांच्या अहवालाचा मसुदा जाहीर करण्यात आलेला नसला, तरी प्रोजेक्ट ऑन गव्हर्नमेण्ट ओव्हरसाइट (पोगो) या स्वतंत्र यंत्रणेने तो मिळविला आहे.
या तपासाने अध्यक्ष ओबामा प्रशासनावर प्रकाशझोत टाकला आहे. संवेदनक्षम माहिती कशी फुटली याबाबत प्रशासनाने सरकारी अधिकारी आणि पत्रकार यांची तडफेने चौकशी केली असली तरी, प्रशासनच कथालेखकाला माहिती पुरविण्यास मदत करीत असल्याचे त्यामुळे सूचित होत आहे.
महानिरीक्षकांनी आपला अहवाल एक महिन्यापूर्वीच सादर केला असला, तरी तो जाहीर करण्यास विलंब केला जात आहे. त्यामुळे राजकीय इशाऱ्यावरून हा विलंब केला जात आहे का, असा संशय बळावत चालला आहे.
पेनेट्टा यांनी दोन वर्षांपूर्वीच अत्यंत गोपनीय माहिती एका समारंभात फोडली. आंतरराष्ट्रीय दहशतवादी लादेन याचा खात्मा करण्याच्या मोहिमेत ज्या अधिकाऱ्यांचा सहभाग होता त्यांच्या सन्मानार्थ आयोजित समारंभात ही माहिती फोडण्यात आली, असे चौकशीत आढळले. पोगोने संकेतस्थळावर हा अहवाल जाहीर केला आहे.
या समारंभाला हॉलीवूड एक्झिक्युटिव्ह आणि कथालेखक मार्क बोल हे उपस्थित होते आणि ते ‘झीरो डार्क थर्टी’वर  काम करीत होते. त्याच समारंभात पेनेट्टा यांनी लादेनच्या ठावठिकाण्यावरछापा टाकणाऱ्या पथकाचा विशेष उल्लेख केला होता.