उत्तर भारताला कडाक्याच्या थंडीने वेढले असून हरियाणा, पंजाबसह उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये रात्रीच्या तापमानात मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. दाट धुक्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीवर तसेच रेल्वे वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला असून जवळजवळ सर्व रेल्वेगाडय़ा किमान दीड ते दोन तास उशिराने धावत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये ‘चिलई कलन’ (कडाक्याच्या थंडीचा काळ) सुरू असून राज्यात हिमवृष्टी झाली.
अमृतसर, लुधियाना आणि पतियाळा या शहरांमध्ये तापमान शून्य ते तीन अंश सेल्सियसदरम्यान राहिले. मात्र सरासरीपेक्षा येथील तापमानात तीन ते चार अंशांनी घसरण झाल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदवले. हरियाणातही परिस्थिती फारशी वेगळी नाही. नारनौल आणि हिस्सार या दोन्ही ठिकाणी तापमानात ५ अंशांनी घसरण होत तापमान दीड अंश सेल्सियसपर्यंत खाली आले. कर्नाल येथे २.४ अंश सेल्सियस, तर अंबाला येथे ५.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मात्र आकाश निरभ्र असल्यामुळे हवाई वाहतुकीत कोणताही अडथळा आला नाही.
 राजस्थानातही लाट
उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा प्रभाव राजस्थानातही दिसला. माऊंट अबू येथील तापमान ०.४ अंश सेल्सियसपर्यंत घसरले. जयपूर, श्रीगंगर, बिकानेर, अजमेर आणि कोटा या सर्वच शहरांमध्ये तापमान साडेचार ते सहा अंश सेल्सियसदरम्यान असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदवले.

काश्मीरमध्ये हिमवृष्टी
जम्मू-काश्मीर राज्याला थंडीने चांगलेच वेढले असून येथे बर्फवृष्टी झाली. पेहेलगाममध्ये सकाळी साडेआठ वाजेपर्यंत तीन इंच बर्फवृष्टी झाल्याची माहिती हवामान खात्याच्या संचालिका सोनम लोटस यांनी दिली. आकाश दिवसभर ढगाळलेले राहिल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील तापमानात मात्र फारशी घसरण झाली नाही, असेही त्या म्हणाल्या. श्रीनगर येथे उणे २.३ अंश सेल्सियस, गुलमर्ग येथे उणे ८.६ अंश सेल्सियस, तर अमरनाथ यात्रेच्या मार्गावर उणे २.२ अंश तापमान नोंदविण्यात आले. कूपवाडा जिल्ह्य़ात तापमानात तीन अंशांची वाढ झाली.