उत्तर भारतातील सर्वच राज्ये गारठलेलीच असून आणखी काही दिवस हीच परिस्थिती कायम राहणार आहे. काश्मीरपासून राजस्थानपर्यंत सर्वच राज्यांना थंडीचा कडाका जाणवत आहे. थंडीबरोबरच धुक्याचेही आगमन झाल्याने उत्तरेतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. विमान, रेल्वे आणि रस्ता वाहतुकीवर याचा परिणाम जाणवत असून काही ठिकाणी वीजपुरवठय़ावरही परिणाम झाला आहे.
काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड व राजस्थान या सर्व राज्यांना थंडीच्या कडाक्याने व्यापले आहे. अनेक ठिकाणी  पाऱ्याने नीचांक गाठला असून गुरुवापर्यंत तरी हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. धुक्याची दुलईनेही सर्व राज्यांना व्यापले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालये, सरकारी व खासगी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
चंडिगढ-हरयाणात विक्रमी नीचांक
हरयाणातील हिसार येथे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. या ठिकाणी पारा शून्याच्याही खाली ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. तर चंडिगढमध्ये तापमान २.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. भिवानी (०.५ सेल्सिअस), नरनौल (३ सेल्सिअस), अमृतसर (१.८ सेल्सिअस) तर पतियाला आणि लुधियाना येथील तापमान अनुक्रमे २.४ व २.७ अंश सेल्सिअस असे मोजण्यात आले. थंडीमुळे वीजपुरवठय़ावरही परिणाम झाला असून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. थंडीचा हा कडाका गुरुवापर्यंत तरी कायम राहील व त्यानंतर त्यात सुधारणा होईल असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
मध्य प्रदेशातही थंडीची लाट
मध्य प्रदेशलाही थंडीच्या लाटेने व्यापले आहे. तिकमगढ, रेवा आणि खजुराहो या ठिकाणी कमी तापमानाची नोंद झाली आहे. तसेच राज्यभरात वाराही जोराने वाहत आहे. भोपाळला यंदाच्या सर्वात कमी तापमानाची म्हणजेच ६.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. धुक्यानेही कहर केला असून त्याचा परिणाम प्रवासी सेवांवर झाला आहे.
दिल्लीही ‘जैसे थे’च
राजधानी दिल्लीतील परिस्थिती सोमवारीही ‘जैसे थे’च राहिली. धुक्याने राजधानीला वेढा घातल्याने विमान, रेल्वे व रस्ता वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. आणखी तीन-चार दिवस ही परिस्थिती कायम राहील असे दिल्लीच्या हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
काश्मिरात बर्फ
दरम्यान, काश्मीर खोऱ्यात पारा शून्याच्याही प्रचंड खाली गेला असून बहुतेक सर्व पाण्याच्या स्रोतांचे बर्फात रुपांतर झाले आहे. श्रीनगरला ४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गुलमर्गला पारा वजा ९.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.
राजस्थानातही गारवा
थंडीची लाट राजस्थानातही पोहोचली असून गंगानगर, चुरू, भरतपूर, वनस्थळी आणि जयपूर या ठिकाणी अनुक्रमे ०.४, ०.८, १.५, १.९ व २.३ अशी तापमानाची नोंद झाली. येत्या चार दिवसांत हीच परिस्थिती कायम राहील असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. लोकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असे आदेश संबंधित राज्यांच्या सरकारांतर्फे देण्यात आले आहेत.