हैदराबादमध्ये गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर आम्हाला काळजी नक्कीच वाटते आहे. मात्र, स्फोटांमुळे हैदराबादमध्ये दुसरी कसोटी आम्ही खेळणार नाही, अशी शंका घेण्याचे सध्यातरी काहीच कारण नाही, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सुदरलॅंड यांनी दिली. दरम्यान, दुसरी कसोटी हैदराबादमध्ये खेळविण्यात येईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियाच्या संघाला पुरेसे संरक्षण देण्यात येईल. असे संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले.
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आजपासून चेन्नईत पहिली कसोटी सुरू झाली. दुसरी कसोटी हैदराबादमध्ये दोन मार्चपासून होणार आहे. हैदराबादमध्ये झालेल्या स्फोटांनंतर ऑस्ट्रेलिया तिथे कसोटी खेळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्या पार्श्वभूमीवर सुदरलॅंड यांनी आपली भूमिका मांडली.
ते म्हणाले, हैदराबादमधील सुरक्षेचा आम्ही निश्चितच आढावा घेऊ. पण सध्यातरी पुढील कसोटी आम्ही न खेळण्याबद्दल कोणतीही शंका घेणे खूप घाईचे ठरेल. सध्यातरी आम्ही चेन्नईमधील कसोटीवर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. पुढील काही दिवसांमध्य़े परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही पुढील निर्णय घेऊ. सध्यातरी ऑस्ट्रेलियाच्या संघाला पुरविण्यात येणाऱया सुरक्षेबद्दल आम्ही पूर्ण समाधानी आहोत.