पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने सोमवारी राष्ट्रकुल स्पर्धेतील गैरव्यवहारप्रकरणी आरोपपत्र निश्चित केले. कलमाडी यांच्यावर फसवणूक आणि ९० कोटींपेक्षा जास्त रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आरोपपत्र निश्चित करण्याच्यावेळी कलमाडी यांच्यासह या खटल्यातील अन्य सर्व आरोपी न्यायालयात उपस्थित होते.
न्यायालयाने या खटल्यातील आरोपींवर विविध गुन्ह्यांखाली आरोपपत्र निश्चित करण्याचा निर्णय २१ डिसेंबरला दिला होता. भारतीय दंडविधान संहिता आणि भ्रष्टाचारविरोधी कायद्याच्या आधारे कलमाडी आणि अन्य नऊ आरोपींवर आरोपपत्र निश्चित करण्यात आले.
गेल्या २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्यावेळी निकाल देण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याचे कंत्राट बेकायदापणे देण्यात आले होते, असे आरोपपत्रात म्हटले आहे. कलमाडी यांच्याबरोबर राष्ट्रकुल स्पर्धा संयोजन समितीचे माजी सरचिटणीस ललित भानोत, समितीचे माजी महासंचालक व्ही. के. वर्मा, स्पर्धा साहित्य खरेदी विभागाचे माजी महासंचालक सुरजित लाल, क्रीडा खात्याचे माजी महासंचालक ए. एस. व्ही प्रसाद, संयोजन समितीचे माजी खजिनदार एम. जयचंद्रन यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले.
पदाचा गैरवापर केल्याचा आरोप संयोजन समितीतच्या सहा पदाधिकाऱयांवर ठेवण्यात आला आहे. फरिदाबाद येथील जेम इंटरनॅशनलचे पी. डी. आर्या व ए. के. मदन आणि एकेआर कन्स्ट्रक्शनचे ए. के. रेड्डी यांच्यावरही आरोप दाखल करण्यात आले आहेत. स्विस टायमिंग ओमेगा यांच्यावरही आरोप दाखल करण्यात आले आहेत.