* २०० दशलक्ष डॉलरची लूट
* १८ जणांना अटक, पाच भारतीयांचा समावेश
लुटलेले पैसे या सर्वानी बनावट बँकखात्यांमार्फत भारतासह पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती, चीन, जपान, कॅनडा आणि रोमानिया या देशांमध्ये पाठवल्याचेही स्पष्ट झाले आहे. अमेरिकेतील पोलीस व गुप्तचर यंत्रणा आता या १६९ बँकांच्या खात्यांची कसून चौकशी करत आहे.
बनावट क्रेडिट कार्ड काढायचे. त्याद्वारे भारंभार कर्जे घ्यायची. कर्जाच्या पैशातून ऐष करायची. कार्डाचा वापर संपला की तसेच दुसरे बनावट क्रेडिट कार्ड काढायचे आणि पुन्हा कर्जे घ्यायची आणि पुन्हा खर्च करायचा.. ही साखळी अव्याहतपणे सुरू ठेवून अमेरिकेतील वित्तीय संस्थांना तब्बल २०० दशलक्ष डॉलरना गंडा घालणाऱ्या १८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अमेरिकेतील या सर्वात मोठय़ा क्रेडिट कार्ड घोटाळ्यात पाच भारतीयांचाही समावेश आहे, हे विशेष.
अमेरिकेत सध्या ‘क्रेडिट कार्ड घोटाळ्या’ने खळबळ उडवून दिली आहे. १८ जणांच्या या टोळक्याने केवळ वित्तीय संस्थाच नव्हे तर संपूर्ण अमेरिकी प्रशासनालाच गंडा घातला असल्याचे बोलले जात आहे. या टोळक्यातील १३ जणांना पोलिसांनी न्यूजर्सी, न्यूयॉर्क, पेनसिल्व्हानिया आणि कनेक्टिकट येथून अटक केली आहे. त्यात बाबर कुरेशी, रघबीरसिंग, मोहम्मद खान, सत्वर्मा, विजय वर्मा, तरसेमलाल आणि विनोद दादलानी या भारतीय वंशाच्या पाच जणांचा समावेश आहे. या सर्वावर आता खटला दाखल करण्यात आला असून या प्रत्येकाला ३० वर्षांची शिक्षा आणि लाखो डॉलरचा दंड होऊ शकतो.
कसा केला घोटाळा?
अमेरिकेतील सर्वात मोठा क्रेडिट कार्ड घोटाळा समजला जाणारा हा घोटाळा या १८ जणांनी अगदी सूत्रबद्धरित्या घडवून आणला. त्यासाठी त्यांनी तीन टप्प्यांचा वापर केला. पहिला म्हणजे स्वतच्या नावाचे बनावट ओळखपत्र तयार करणे.
या ओळखपत्राला अधिक बळकटी देण्यासाठी स्वतच्या नावावर मोठमोठय़ा वित्तसंस्थांचे कर्ज कसे आहे आणि ते आपण कसे वेळेवर फेडत आहोत याची खात्री देणारी कागदपत्रे सादर करणे.
या कागदपत्रांच्या आधारे अधिक कर्ज आणि क्रेडिट मिळवणे. त्यानंतर बनावट क्रेडिट कार्ड तयार करून महागडय़ा गाडय़ा, उंची कपडे, स्पामधील उपचार व मोठय़ा प्रमाणात सोने खरेदी करण्याचा सपाटा या सर्वानी लावला.
याखेरीज त्यांच्याकडे मोठय़ा प्रमाणात रोख रक्कमही जमली.