खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले एकूण १३० उमेदवार १२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवत आहेत. या टप्प्यात २४३ पैकी ४९ मतदारसंघांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत ५८३ उमेदवार मैदानात आहेत.
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मिळवलेल्या उमेदवारांच्या शपथपत्रांच्या आधारे ‘दि असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉम्र्स’ (एडीआर) या संस्थेने एक अहवाल तयार केला आहे. एकूण १७० उमेदवारांविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदवण्यात आले असून, त्यापैकी ३७ जागांवर लढणाऱ्या १३० जणांवर गंभीर स्वरूपाचे अजामीनपात्र गुन्हे दाखल असल्याचे या अहवालात म्हटले आहे.वरसालीगंज मतदारसंघातील जद (यू)चे उमेदवार यांनी स्वत:विरुद्धच्या खुनाशी संबंधित ४ गुन्ह्य़ांची माहिती दिली असून, एकूण १६ उमेदवारांविरुद्ध अशाच प्रकारचे गुन्हे आहेत. सात अपक्ष उमेदवारांविरुद्धही खुनाचे गुन्हे दाखल आहेत. एकूण ३७ उमेदवारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. हिसुआ मतदारसंघातून लढणारे अपक्ष उमेदवार रामस्वरूप यादव यांच्यावर असे ५ गुन्हे दाखल आहेत, तर बसप, भाजप व जनअधिकार पक्ष यांच्या प्रत्येकी ३ आणि जद (यू) च्या ३ उमेदवारांनी आपल्याविरुद्ध याच गुन्ह्य़ांची माहिती जाहीर केली आहे.