पहिल्या टप्प्यातील प्रचार आज संपणार
गुजरातचे घमासान
सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचे स्वप्न पाहणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांना टक्कर देऊन ‘चमत्कार’ घडवू पाहणारे विरोधी पक्ष यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींचा अखेरचा ‘गरबा’ आज, मंगळवारी पार पडणार आहे. येत्या गुरुवारी, १३ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी संपणार आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेस, भाजप आणि अन्य पक्षांच्या बडय़ा नेत्यांच्या प्रचारसभांनी चांगलाच धुरळा उडणार आहे.
गुजरातमध्ये १३ आणि १७ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान पार पडणार असून, १३ तारखेच्या मतदानासाठीची आचारसंहिता मंगळवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून लागू होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पटन जिल्ह्यात सिद्धपूर आणि खेडा जिल्ह्यात डाकोर येथे सोमवारी जाहीर सभा घेतल्या. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी साणंद, जामनगर आणि अमरेली हे मंगळवारी रॅली घेणार आहेत.
एकाच वेळी ५३ ठिकाणी
दुसरीकडे, भाजपचे ‘एकखांबी तंबू’ असलेले नरेंद्र मोदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रचाराचे रान उठवत आहेत. मोदी यांनी सोमवारी थ्रीडी होलोग्राफिक प्रोजेक्शन टेक्नोलॉजीचा वापर करून एकाच वेळी ५३ ठिकाणच्या जाहीर सभा संबोधित केल्या. याशिवाय त्यांनी सहा रॅलींतही सहभाग घेतला.     
पंतप्रधानांना जदयुचा पाठिंबा
मोदी सरकारच्या कार्यकाळात अल्पसंख्याक व काही सरकारी अधिकाऱ्यांना असुरक्षित वाटत आहे, या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या विधानाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील भाजपचा मित्रपक्ष जनता दल युनायटेडनेही (जदयु) पाठिंबा दर्शवला आहे. पंतप्रधानांनी रविवारी गुजरातमध्ये घेतलेल्या सभेत ही टीका केली होती. त्यावर जदयुचे नेते शिवानंद तिवारी म्हणाले, ‘मोदींबाबत अल्पसंख्याकांच्या मनात काही गंभीर आक्षेप आहेत, हे खरे आहे. पंतप्रधानांनी काँग्रेस नेता या नात्याने याला वाचा फोडली आहे.’