भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलची १२.५ एकर जागा महाराष्ट्र शासनाला हस्तांतरीत करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा उद्या संसदेत करण्यात येणार आहे. लोकसभेत वस्त्रोद्योग व वाणिज्य मंत्री आनंद शर्मा तर राज्यसभेत संसदीय कार्य राज्यमंत्री राजीव शुक्ला इंदू मिलची जागा केंद्राकडून महाराष्ट्र शासनाला हस्तांतरीत करण्यात येत असल्याची घोषणा करतील.
केंद्र सरकारच्या अखत्यारीतील राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात असलेली इंदू मिलची जागा डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मिळावी म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करीत होते. इंदू मिलच्या जागेचे हस्तांतरण करण्यापूर्वी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करण्यासाठी  केंद्रीय वस्त्रोद्योग सचिवांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि अन्य अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली होती. मुख्यमंत्री चव्हाण यांनी यासंबंधी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि आपली भेट घेऊन वेळोवेळी पाठपुरावा केला. गेल्या आठवडय़ाभरापासून यासंबंधीच्या घडामोडी निर्णायक टप्प्यात पोहोचल्या होत्या. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने वस्त्रोद्योग व वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांची इंदू मिलच्या जागेसाठी आग्रही असलेले रिपाइं नेते रामदास आठवले यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या जागेच्या हस्तांतरणाची घोषणा येत्या गुरुवारी, ६ डिसेंबर रोजी डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापूर्वी करण्यात येईल, हेही स्पष्ट करण्यात आले होते. परंतु, आज दुपारी आनंद शर्मा तर सायंकाळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन इंदू मिलच्या हस्तांतरणाचा मार्ग प्रशस्त करीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील काँग्रेसचे केंद्रीय मंत्री व खासदार तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या शिष्टमंडळाने श्रेयही पदरी पाडून घेतले.