अमेरिकेची नासा ही अवकाश संशोधन संस्था २०१६ मध्ये मंगळावर एक नवीन यांत्रिक गाडी पाठवीत असून तिच्या समवेत मंगळाभोवती फिरू शकतील, असे दोन क्यूबसॅट उपग्रह सोडणार आहे, ते मंगळाच्या कक्षेत फिरून माहिती गोळा करतील.
क्यूबसॅट हे असे उपग्रह आहेत जे अतिशय लहान असूनही अचूक तंत्रज्ञानाने माहिती गोळा करू शकतात, असे अनेक क्यूबसॅट विद्यापीठातील मुलांनी तयार केले असून, ते जादा पेलोड म्हणून पृथ्वीच्या कक्षेतही यापूर्वी सोडण्यात आले आहेत.
मोठय़ा उपग्रहांबरोबर हे छोटे उपग्रहही सोडले जातात. हे छोटे उपग्रह संबंधित ग्रहाजवळून जातात व त्याचे निरीक्षण करीत ती माहिती मुख्य अवकाशयानाकडे पाठवतात. मंगळावर सोडण्यात येणारे हे दोन उपग्रह त्यांनी मंगळाविषयी गोळा केलेली माहिती यांत्रिक गाडीला पाठवतील.
दोन क्यूबसॅट हे रिले पद्धतीने काम करणार असून, ते कॅलिफोर्नियातील पॅसाडेनात जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीने तयार केले आहेत, असे नासाने म्हटले आहे. मार्स क्यूब १ (मार्को) हा छोटा उपग्रह त्यात समाविष्ट आहे. मार्च २०१६ मध्ये तो नासाच्या इनसाइट लँडर समवेत सोडला जाईल. मंगळाची अंतर्गत रचना समजण्यासाठी इनसाईट लँडर ही नासाची पहिलीच मोहीम आहे. मार्को उपग्रह हे मंगळाभोवती फिरतील व इनसाईट मंगळावर सप्टेंबर २०१६ मध्ये उतरेल. मार्को उपग्रहांच्या कामावर या मोहिमेची यशस्विता मात्र अवलंबून असणार नाही असे नासाचे ग्रह संशोधन संचालक जिम ग्रीन यांनी सांगितले. मार्को उपग्रह स्वतंत्रपणे मंगळाचे निरीक्षण करतील. अ‍ॅटलास बूस्टरच्या मदतीने हे उपग्रह सोडले जाणार आहेत. दोन सोलर पॅनेल व रेडिओ अँटेना सुरू करणे हे त्यांच्याबाबत मोठे आव्हान असणार आहे. मंगळासाठी वेगळी संदेशवहन प्रणाली तयार करण्यासाठी मार्को (मार्स क्यूब वन) उपग्रहांचा प्रयोग उपयोगी पडणार आहे. मंगळाच्या वातावरणातील प्रवेशापासून यान तेथील जमिनीवर उतरेपर्यंतचा जो महत्त्वाचा काळ असतो त्यात यान नियंत्रित करण्याच्या तंत्रज्ञानात या संशोधनाने मोठी भर पडणार आहे.