अनेकांच्या आवडत्या फेसबुक या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळाच्या  संगणक प्रणालीवर अत्याधुनिक पद्धतीने सायबर  हल्ला झाला असून त्यात माहितीची चोरी झाल्याचे कुठलेही पुरावे नाहीत.
फेसबुकने म्हटले आहे की, एका संकेतस्थळाकडूनच सदर मालवेअर आले व ते संकेतस्थळ एका मोबाईल डेव्हलपरचे आहे. आम्ही सर्व संसर्गित संगणकांची तपासणी केली आहे व त्यानंतर कायदा अंमलबजावणी संस्थांना माहिती दिली असून कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
ओरॅकलच्या जावा सॉफ्टवेअरमधील उणिवांचा फायदा उठवित हल्लेखोरांनी सायबर हल्ला केला असून हॅकर्सनी डेव्हलपर्स व तंत्रज्ञान कंपन्या यांना लक्ष्य बनवले होते. या हल्ल्यात फेसबुकलाच फटका बसला आहे असे नाही इतरांनाही त्याचा फटका बसला आहे, असे उत्तर कॅलिफोर्नियातील एका कंपनीने सांगितले.
अमेरिका सायबर हेरगिरीला बळी पडत असून त्याचा परिणाम स्पर्धात्कमतेवर होत आहे असे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.
हॅकिंगमध्ये अमेरिकेच्या ऊर्जा, अर्थ, माहिती तंत्रज्ञान, एरोस्पेस, स्वयंचलित वाहने या क्षेत्रातील कंपन्यांना फटका बसला आहे. आठच दिवसांपूर्वी ट्विटर या संकतेस्थळावर हल्ला झाला होता व त्यात अडीच लाख पासवर्ड चोरले गेले होते. न्यूयॉर्क टाइम्स तसेच वॉल स्ट्रीट जर्नल यांनाही हॅकिंगचा तडाखा बसला असून त्यांनी या हल्ल्यांबाबत चीनला जबाबदार ठरवले आहे.