घरात गोमांस ठेवल्याच्या संशयावरून अखलाख यांची हत्या करण्यात आलेल्या दादरीत अनेक ‘सेना’ अस्तित्वात असून, जातिनिहाय आरक्षण संपविण्यासाठी त्या कार्यरत असल्याचा निष्कर्ष जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रा. डॉ. विकास वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या ‘जनहस्तक्षेप’ गटाने काढला आहे.

डाव्यांचे ‘लाल विद्यापीठ’ अशी ओळख असलेल्या जेएनयूमधील एक मोठा गट दादरीमधील घटनेविरोधात संघटित झाला असून, या गटाने अलीकडेच दादरीला भेट दिली. या गटात दिल्ली विद्यापीठातील प्रा. ईश मिश्रा, दिल्लीस्थित पत्रकार राजेश कुमार, अनिल दुबे, मानवाधिकार कार्यकर्त्यां शीतल भोपल यांचा समावेश होता.
जातीय तणावाची कोणतीही पाश्र्वभूमी नसलेल्या दादरीमध्ये गेल्या दशकभरात अनेक संघटनांचा उदय झाला आहे. ज्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी प्रताप सेना, समाधान सेना, राम सेना, गोरक्षा िहदू दल, आर्य वीर दल, हिंदू रक्षा दल आदींचा समावेश आहे. या संघटनांमध्ये युवकांचा प्रामुख्याने सहभाग असतो, असा दावा समितीने केला आहे.

‘दादरीबाबत बोलल्यास वाजपेयींना आवडणार नाही’
आग्रा : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून त्यांच्यावर सातत्याने टीका करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे. दादरी प्रकरणावर बोललो तर ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आवडणार नाही, असे विधान अडवाणी यांनी आग्रा येथील एका कार्यक्रमात केले आहे. सध्या देशात जी स्थिती आहे त्यामधून केंद्र सरकारच्या उणिवा समोर येत आहेत. त्यामुळे या उणिवांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दादरी प्रकरणामुळे केवळ केंद्र सरकारलाच नव्हे तर भाजपच्या नेत्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, असेही लालकृष्ण अडवाणी म्हणाले.