काश्मिरातील फुटीरतावादी नेत्यांना भेटणारच, या पाकिस्तानच्या दुराग्रहामुळे उभय देशांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर रविवारी होणारी चर्चा अडचणीत आली आहे. पाकिस्तानने हुरियत नेत्यांना भेटता कामा नये, असा भारताचा पवित्रा आहे आणि काश्मिरी नेत्यांच्या भेटी ही ‘नित्याचीच बाब’ असल्याची पाकिस्तानची भूमिका आहे. रविवारी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याशी होऊ घातलेल्या चर्चेआधी हुरियत नेत्यांना भेटण्याची योजना मात्र पाकिस्तानने शुक्रवारी रात्री गुंडाळली असून फुटीरतावादी नेत्यांशी रविवारऐवजी सोमवारी बैठक ठेवून उभय देशांतील चर्चेचा अडसर दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ हे सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता हुरियत नेते सईद अली शाह गिलानी यांना भेटतील, असे पाकिस्तानने शुक्रवारी रात्री उशीरा जाहीर केले. भारत व पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चेच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानी उच्चायुक्तांनी काश्मिरातील हुरियत नेत्यांना दिल्लीत चर्चेसाठी आमंत्रित केले. त्यास भारताने आक्षेप घेतला. गुरुवारी फुटीरतावादी नेत्यांना दोन तास नजरकैदेत ठेवून भारताने पाकिस्तानला योग्य तो संदेशही दिला. मात्र, शुक्रवारीही पाकिस्तानने फुटीरतावादी नेत्यांना भेटून चर्चा करण्याचा हट्टाग्रह कायम ठेवला. दिवसभरात उभय बाजूंनी बऱ्याच घडामोडी घडल्या. पाकिस्तानने विनाअट चर्चेस येऊन रशियातील उफा येथे झालेल्या मोदी-शरीफ चर्चेतील संकेत पाळावेत, असे भारताने सुनावले. पाकिस्तानने मात्र ही चर्चा विनाअट असल्याचे सांगत आपला हेका कायम ठेवला.

अमेरिकेचा दबाव
दहशतवाद रोखण्याच्या मुद्दय़ावरून अमेरिकेनेही पाकिस्तानच्या मदतीचा स्रोत रोखण्याचा विचार गांभीर्याने सुरू केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ ऑक्टोबरमध्ये अमेरिका दौऱ्यावर जाणार असून ओबामा यांच्याशी चर्चा करतील, अशा बातम्या पाकिस्तानात झळकल्या आहेत. अमेरिकन अध्यक्षांच्या प्रासाद प्रवक्त्याने मात्र ‘आमच्यासाठीही ही बातमीच आहे,’ असा टोला लगावत अशी कोणतीही भेट नियोजित नसल्याचेच स्पष्ट केले.