गेल्या १० वर्षांत महाराष्ट्र सरकारने किती मान्यवर व्यक्तींवर सरकारी इतमामात अन्त्यसंस्कार केले. त्यासाठी किती खर्च झाला. याबाबतचा कोणताही तपशील सरकारकडे उपलब्ध नाही. गेल्या वर्षी २१ जूनला मंत्रालयात लागलेल्या आगीत या संबंधीचा तपशील जळून खाक झाल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे.
लखनऊ येथील सामाजिक कार्यकर्त्यां उर्वशी शर्मा यांनी माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सामान्य प्रशासन विभागाने आगीचे कारण दिले आहे. या आगीनंतर केवळ आठ मान्यवर व्यक्तींवर सरकारी इतमामात अन्त्यसंस्कार करण्यात आले, त्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा समावेश आहे. तर सरकारी इतमामातील अन्त्यसंस्काराच्या खर्चाचा तपशील न देता, प्रशासन विभागाने मान्यवर व्यक्तींवर करण्यात येणारा अन्त्यसंस्काराचा खर्च त्या-त्या विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या निधीतून करण्यात येत असल्याचे उत्तरात म्हटले आहे. सरकारी इतमामात अन्त्यसंस्कारासंबंधी केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे असलेला दस्तावेजही या आगीत खाक झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ही मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली होती. त्यांच्याकडून पुन्हा ती मागविण्यात आल्याचे प्रशासन विभागाने शर्मा यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.