सामूहिक बलात्कार आणि अमानुष मारहाणीत प्राण गमावतानाच देशभर जागृतीची लाट पसरविणाऱ्या ‘त्या’ तरुणीचे नाव उघड करण्याची तिच्या वडिलांचीच इच्छा आहे. माझ्या मुलीने कोणतेही गैरकृत्य केलेले नाही. स्वतचे संरक्षण करताना ती शौर्याने मृत्यूला सामोरी गेली आहे. मला तिचा अभिमान आहे. तिचे नाव जाहीर केले तर अशा पाशवी अत्याचारांचा सामना करणाऱ्या तरुणींना बळ येईल, असे त्यांनी ‘द डेली मिरर’ या वृत्तपत्राला खास मुलाखतीत सांगितले.
उत्तर प्रदेशातील आपल्या गावात या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी बोलताना पन्नाशी पार केलेल्या या पित्याच्या चेहऱ्यावर गेल्या काही दिवसांच्या मानसिक तणाव आणि शारीरिक दगदगीच्या खुणा दिसत होत्या. मात्र आपल्या मुलीच्या अभिमानाने त्यांचा ऊर भरून येत होता. जगाला तिचे नाव कळावे, असे ते म्हणाले आणि ही गोष्ट सोशल मिडीयावर प्रसारित होताच चर्चेला तोंड फुटले.
या वृत्तपत्राने या वडिलांचे छायाचित्र व त्यांचे नाव तसेच त्या मुलीचे नावही प्रसिद्ध केले आहे. तिच्या वडिलांच्याच सहमतीने तिचे नाव उघड केल्याचे वृत्तपत्राने नमूद केले आहे.
मला सुरुवातीला त्या नराधमांना पाहाण्याची इच्छा होती. आता ती उरलेली नाही. आता केवळ न्यायालयाने त्या सहाहीजणांना फाशी ठोठावली आहे, हे ऐकायची इच्छा उरली आहे, असे ते म्हणाले.