खुनाचा गुन्हा दाखल करणार
सामुदायिक बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ इंडिया गेट येथ रविवारी आयोजित करण्यात आलेल्या निषेध मोर्चादरम्यान संतप्त जमावाला रोखताना जखमी झालेल्या सुभाष चंद तोमर (४७) या पोलीस कर्मचाऱ्याचा मंगळवारी लोहिया रुग्णालयात मृत्यू झाला. निदर्शने करणाऱ्यांनी आपल्या वडिलांना मारहाण केल्याचा आरोप तोमर यांचा मुलगा दीपक याने केला आहे.
मूळचे उत्तर प्रदेशमधील मीरत येथील असलेल्या तोमर यांची इंडिया गेटजवळ नेमणूक करण्यात आली होती. जमाव िहसक होऊन उडालेल्या चकमकीत तोमर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिल्ली पोलिसांनी आपला एक दिवसाचा पगार तोमर यांच्या कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या आठ कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्यांच्यावर आता याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.