शिवसेनेच्या विरोधामुळे ज्येष्ठ गझल गायक गुलाम अली यांचा ९ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आल्यानंतर गुरूवारी दिल्ली सरकारने गुलाम अली यांना निमंत्रण दिले. अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील सांस्कृतिक मंत्री कपिल मिश्रा यांनी गुरूवारी ट्विटरवरून गुलाम अली यांना दिल्लीत कार्यक्रम सादर करावा, असे सांगितले. गुलाम अलींचा कार्यक्रम मुंबईत होऊ शकला नाही, ही दुख:द घटना आहे. त्यामुळे मी त्यांना दिल्लीत येण्याचे आमंत्रण देतो. संगीताला कोणत्याही देशाच्या सीमा नसतात, असे मिश्रा यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवण्यास किंवा तेथील खेळाडू व कलावंत यांना मुंबईत किंवा राज्यात पाय ठेवू देणार नाही, या शिवसेनेच्या भूमिकेमुळे आयोजकांनी गुलाम अलींचा मुंबईतला कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्यानंतर विरोधी पक्षांकडून शिवसेना आणि भाजपवर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली होती. मात्र, आमचा विरोध गुलाम अलींना नसून पाकिस्ताकडून सुरू असलेल्या हिंसेला आहे. पाकने भारतातील दहशतवादी कारवाया थांबविल्या पाहिजेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
‘पनाश मीडिया’तर्फे ९ ऑक्टोबर रोजी षण्मुखानंद सभागृहात गुलाम अली यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण त्यास शिवसेनेचा विरोध असून तरीही तो आयोजित करण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेनेच्या पद्धतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा चित्रपट सेनेचे सरचिटणीस अक्षय बर्दापूरकर यांनी दिला. त्यानंतर आयोजकांनी उद्धव ठाकरेंना कार्यक्रम आयोजित करू देण्यासाठी गळही घातली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी विरोध मागे घेण्यास नकार दिल्याने अखेर आयोजकांनी हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला.