दिल्लीत चालत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ इंडिया गेट आणि रायसीना हिल्स परिसरात सुरु असलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागून आंदोलक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. शांततामय आंदोलन करण्यासाठी जमलेल्या निदर्शकांमध्ये समाजकंटक घुसल्याने इंडिया गेटवर जाळपोळ, दगडफेकीमुळे हिंसाचाराचे थैमान माजले आणि देशाच्या राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडून अराजक माजल्याचे चित्र तयार झाले. परिस्थितीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी दिल्ली पोलीस, जलद कृती दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि सैन्याच्या दोन तुकडय़ांनी महिलांवरही लाठीमार केला. पोलिसांच्या तडाख्यातून वृत्तवाहिन्यांचे कॅमेरामन, प्रतिनिधी आणि त्यांची उपकरणेही सुटली नाहीत. आंदोलकांनीही पोलिसांवर दगडफेक आणि जाळपोळ करीत मोठय़ा प्रमाणावर सरकारी संपत्तीची हानी केली. या धुमश्चक्रीत माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह तसेच अनेक महिलांसह शेकडो आंदोलक जखमी झाले. दिल्ली पोलीसचा एक शिपाईही गंभीर जखमी झाला. रात्रीपर्यंत पोलिसांनी या आंदोलनावर कसेबसे नियंत्रण प्रस्थापित केले.
सोनियांशी आंदोलकांची चर्चा
शनिवारी दिवसभर चाललेल्या उग्र आंदोलनाअंती मनमोहन सिंग सरकारच्या वतीने बलात्काराच्या आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी सर्वतोपरी उपाय हाती घेण्याचे आश्वासन दिल्यानंतरही आज सकाळी साडेआठ-नऊ वाजतापासून आंदोलक इंडिया गेटपाशी गोळा व्हायला सुरुवात झाली होती. मध्यरात्रीनंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आंदोलकांच्या प्रतिनिधींशी केली आणि आज सकाळी राहुल गांधी यांच्यासोबत त्यांनी पुन्हा आंदोलक प्रतिनिधींशी दीड तास चर्चा करून बलात्कार प्रकरणी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. या चर्चेच्या वेळी गृह राज्यमंत्री आर.पी.एन. सिंह आणि काँग्रेस प्रवक्त्या खासदार रेणुका चौधरीही उपस्थित होत्या. सोनियांच्या आश्वासनामुळे निदर्शकांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केल्यानंतरही इंडिया गेटवर आंदोलन पुन्हा पेटले.
केजरीवाल, रामदेव, सिंह आंदोलनात उतरले
आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल, योगगुरु बाबा रामदेव, माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह अभाविप आणि एनएसयुआयचे कार्यकर्तेही उतरल्यामुळे या आंदोलनाला राजकीय वळण लागले. त्यातच काही समाजविघातक तत्वांचा आंदोलनात शिरकाव झाल्याचा संशय दिल्ली पोलीस व्यक्त करीत होते. आज सकाळपासून इंडिया गेट, राजपथ आणि विजय चौकापाशी पुन्हा उग्र निदर्शनांना सुरुवात झाली. जंतरमंतर सोडून नवी दिल्ली सर्व भागांमध्ये जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला होता. इंडिया गेटकडे जाणारे सर्व रस्ते बंद करून या परिसराची नाकेबंदी करण्यात आली होती. या परिसरात सहज पोहोचण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या मेट्रो रेल्वेची सहा स्थानके बंद करण्यात आली होती. पण हा आदेश मोडण्यासाठी आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल आणि त्यांच्यापाठोपाठ आपल्या समर्थकांसह बसेसमध्ये बसून बाबा रामदेव इंडिया गेटच्या दिशेने पोहोचू लागले.
 परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी निदर्शकांना पांगविण्यासाठी लाठीमार केला, अश्रुधूराचा वापर केला आणि अतिशय बोचऱ्या थंडीच्या वातावरणात पाण्याचे तीव्र फवारेही सोडले. पण निदर्शक मागे हटले नाहीत आणि त्यांचा पोलीस यांच्यातील संघर्ष दिवसभर सुरुच राहिला. राजपथवर २६ जानेवारीच्या संचालनाच्या तयारीसाठी ठेवण्यात आलेले लाकडी खांब निदर्शकांनी पेटविले, लोखंडाच्या कांबींनी पोलिसांवर हल्ला केला आणि दगडफेकही केली.