अल्वर जिल्ह्य़ातील शाळांमध्ये विद्यार्थिनींना स्कर्ट घालण्यास बंदी घालावी, अशी मागणी भाजप आमदार बनवारी सिंघल यांनी केली आहे. सिंघल यांच्या या मागणीने महिलावर्गात संतापाची भावना पसरली आहे. याप्रकरणी सिंघल यांनी माफी मागावी, या मागणीसाठी महिला संघटनांच्या पदाधिकारी आणि मुलींनी विधिमंडळासमोर निषेध मोर्चा काढला.
सिंघल यांचे वक्तव्य बालिश असून त्यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे ते संकुचित वृत्तीचे असल्याचेच दिसून येते, अशी टीका गुरजित कौर या विद्यार्थिनीने केली. सिंगल यांनी याप्रकरणी तातडीने महिला वर्गाची माफी मागावी, अशीही मागणी करीत जोपर्यंत ते माफी मागत नाहीत, तोपर्यंत निदर्शने सुरूच ठेवली जातील, असा इशाराही दिला.
माजी पोलीस अधिकारी किरण बेदी यांनी सिंघल यांच्या विधानाचा समाचार घेताना सांगितले की, स्कर्ट घालणे म्हणून चुकीचे वागणे, असा अर्थ नाही. तो एक पोषाख आहे. त्यामुळे पोषाखाबाबत नवीन नियम लागू करण्याबाबत निर्णय घेण्याआधी आपल्या लोकप्रतिनिधींनी कशा प्रकारे आपली मते मांडावीत, याकडे प्रथम लक्ष देण्याची गरज असल्याचे बेदी यांनी सांगितले. इतर महिला संघटनांच्या प्रतिनिधींनीदेखील सिंघल यांच्या वक्तव्यावर टीका केली.
आमदार सिंघल यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, मुली तसेच इतरांनी आपल्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढू नये. मुलींची पुरुषांकडून होणारी छेडछाड टाळण्यासाठी तसेच त्यांना मुक्तपणे वावरता यावे यासाठी आपण ही मागणी केली. आपला हेतू त्यांनी लक्षात घ्यावा. सिंघल यांनी शुक्रवारी मुख्य सचिवांना पत्र लिहून शाळांमध्ये सलवार-कुर्ता किंवा फूल पँट, असा पोषाख लागू करावा, अशी मागणी केली होती.