बंदुकीवर नियंत्रण आणण्यासाठी कडक कायदा असावा, या बाबत जनमताचा जोरदार रेटा असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी, बंदूक खरेदी करणाऱ्यांची चौकशी करण्यासाठी आणि लष्करी पद्धतीच्या शस्त्रांवर बंदी आणण्यासाठी तातडीने कायदा करण्याबाबत वेगाने पावले उचलावी, असे आवाहन काँग्रेसजनांना केले आहे.
बंदुकीवर नियंत्रण आणण्यासाठी ओबामा यांनी २३ कडक उपाय प्रस्तावित केले असून त्यानंतर अध्यक्षांनी अमेरिकेच्या काँग्रेसजनांनावरील आवाहन केले आहे. प्रत्येक व्यक्तीला बंदूक बाळगण्याचा अधिकार घटनेने दिला असला तरी ज्यांची बंदूक घेण्याची कुवत नाही, त्यांना शस्त्र बाळगण्याचा अधिकार देऊ नये, असे ओबामा यांचे म्हणणे आहे.
आपले प्रशासन या बाबत कठोर पावले उचलत असून बंदुकीचा हिंसाचार रोखण्यासाठी ज्या शाळांना अधिकाऱ्याची गरज आहे, त्यांना तसे अधिकारी नेमण्याचा अधिकार देण्याचेही ओबामा यांनी देशाला उद्देशून केलेल्या आवाहनात स्पष्ट केले आहे. तथापि, याचा वास्तवात फरक जाणविण्यासाठी काँग्रेसजनांच्या पाठिंब्याचीही गरज आहे, असेही ते म्हणाले.