डिझेलच्या दरात प्रतिलिटर तीन ते साडेचार रुपयांनी वाढ करण्याची तसेच घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांनी वाढ करण्याची शिफारस तेल मंत्रालयाने केली आहे. याचबरोबर अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या सहावरून नऊ करण्याचा प्रस्तावही मंत्रालयाने केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवला आहे. इंधनांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानांमुळे एक लाख ६० हजार कोटी रुपये इतकी प्रचंड तूट सरकारला सोसावी लागत आहे. ती भरून काढण्यासाठी दोन टप्प्यांत प्रति सिलिंडर १०० रुपये वाढ एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने करण्यात यावी. यामुळे अनुदानित सिलिंडरसाठी ४९०.५० रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरात एप्रिलपासून लिटरमागे एक रुपयाने वाढ करण्यात यावी. ती वाढ प्रतिलिटर तीन ते साडेचार रुपये एवढी असावी. म्हणजे सध्या डिझेलच्या लिटरमागे सरकारला बसत असलेली १०.१६ रुपयांची झळ संपुष्टात येऊ शकेल. केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या, गुरुवारी बैठक होत आहे.