आधुनिक काळातील मुंबईनजीकच्या दख्खनमधील पायऱ्यांची रचना असलेल्या मोठय़ा टेकडय़ांच्या पट्टय़ातील (माथेरानसह पश्चिम घाटाचा काही भाग) ज्वालामुखीमुळे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील महाकाय डायनॉसॉर नष्ट झाले. आतापर्यंत समजले जाते त्याप्रमाणे लघुग्रहाच्या आघातामुळे ते नष्ट झालेले नाहीत, असे एका संशोधनात दिसून आले आहे.
संशोधकांच्या मते मुंबईजवळच्या दख्खनच्या पट्टय़ात हजारो वर्षे लाव्हारस वाहत होता. त्यामुळे विषारी अशा गंधक व कार्बन डायॉक्साइडचे वातावरणातील प्रमाण वाढले. त्याचा परिणाम म्हणून जागतिक तपमानवाढ व महासागरांचे आम्लभवन होऊन डायनॉसॉर नष्ट झाले.‘लाइव्ह सायन्स’ या नियतकालिकाने म्हटले आहे की, डायनॉसॉर हे लघुग्रहाच्या आघाताने नष्ट झाले किंवा ज्वालामुखीमुळे नष्ट झाले असा वाद आहे, त्याला के-टी एक्सटिंशन असे म्हटले जाते.  प्रिन्स्टन विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्रज्ञ गेरटा केलर यांच्या मते, के-टी मास एक्सटिंशनच्या सिद्धांतावर आमच्या संशोधनाने नवे मूल्यमापन होणार आहे.  ज्वालामुखीमुळे डायनॉसॉर नष्ट झाले, असा केलर यांचा अनेक वर्षांपासूनचा दावा आहे. तथापि ‘अल्वारेझ सिद्धांता’नुसार मेक्सिकोतील चिक्सलब येथे आदळलेली महाकाय उल्का हे डायनॉसॉर नष्ट होण्याचे कारण आहे. त्या उल्काआघाताने धूळ व विषारी वायू वातावरणात उसळले व सूर्य झाकला गेला. परिणामी पृथ्वी थंड पडली, त्यामुळे डायनॉसॉरचे प्राण घुसमटून ते मेले तसेच सागरी जीवनही विषनिर्मितीने नष्ट झाले.डायनॉसॉर नष्ट होण्याच्या अगोदर दख्खनचा पट्टा असित्वात होता व तेथील ज्वालामुखीमुळे डायनॉसॉर नष्ट झाले, असे सिद्ध झाले आहे, असा दावा पोर्तुगालच्या लिस्बन विद्यापीठाचे भूगर्भवैज्ञानिक एरिक फाँट यांनी केला आहे. २००९ मध्ये भारताच्या पूर्व किनाऱ्यावर खोदकाम चालू असताना सागरी क्षेत्रात ३.३ किलोमीटर खोलीवर लाव्हारसाने भरलेले खडक सापडले होते. केलर व त्यांच्या सहकाऱ्यांना के-टी सीमा किंवा क्रेटॅशियस टेर्शरी या भागात डायनॉसॉर नष्ट झाले त्या काळातील बरेच जीवाश्म सापडले आहेत. त्या वेळी ज्या लाव्हारसामुळे खडक बनले, तो लाव्हा दख्खनपासून १६०३ कि.मी. अंतरापर्यंत वाहत गेला होता. आज जो ज्वालामुखीप्रवण भाग आहे, तो फ्रान्सच्या आकाराएवढा असला तरी क्रेटॅशियस काळात तो सक्रिय असताना युरोपएवढा ज्वालामुखीप्रवण भाग होता, असे फ्रान्सच्या लॉसन विद्यापीठातील अडेट थिअरी यांनी म्हटले आहे.
जीवाश्म नोंदीनुसार प्लँक्टनच्या जातींचे जे जीवाश्म सापडले आहेत, त्यांत लहान आकाराचे शंखासारखे घटक आहेत. त्यावरून ते ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर अनेक वर्षांनी तयार झाले असावेत.