लहान मुले जशी रांगतात तसेच डायनॉसॉरही प्रौढावस्थेत दोन पायांवर चालण्यापूर्वी चार हात-पायांवर रांगत होते असे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे.
नवीन संशोधनानुसार सिटाकोसॉरस म्हणजे पॅरट डायनॉसॉर हे चार पायांवर अडखळत चालत होते व नंतर ते दोन पायांवर चालू लागले. दहा कोटी वर्षांपूर्वी सध्याच्या चीनमध्ये ते अस्तित्त्वात होते. डायनॉसारची वाढ ही माणसांप्रमाणेच झाली, त्यांनी सुरूवातीला चार पायांवर अडखळत रांगल्यासारखे चालण्यास सुरूवात केली व नंतर ते सरळ उभे राहून चालू लागले. बीजिंग, ब्रिस्टॉल व बॉन येथील जीवाश्मवैज्ञानिकांनी जैवयांत्रिक विश्लेषण व हाडांच्या तपासणीवरून हे डायनॉसॉर चार पायांवरून दोन पायांवर कसे चालू लागले याचे स्पष्टीकरण केले आहे. चीन व पूर्व आशियातील काही भागात क्रॅटॅशियस काळात ज्या एक हजार प्रजाती अस्तित्वात होत्या त्यात सिटाकोसॉरस म्हणजे पॅरट डायनॉसॉरचा समावेश होता. ब्रिस्टॉल विद्यापीठआतील क्वि झाओ यांनी या जीवाश्मातील लहान पिले, बालावस्था व प्रौढावस्था यांचा अभ्यास केला आहे.
त्यांनी सांगितले की, सिटाकोसॉरसची काही हाडे केवळ काही मिलीमीटर व्यासाची होती त्यामुळे ती हाताळणे फार नाजूक काम होते. दोन हात व दोन पाय अशी १६ डायनॉसॉरमधील हाडे वर्षभरात गोळा करण्यात आली त्यातील काही डायनॉसॉर हे एक वर्ष वयापासून ते दहा वर्षे वयापर्यंतचे होते. यातील एक वर्षे वयाचे डायनॉसॉर आखूड पायाचे व लांब बाहूचे होते, त्यांच्या बाहूंच्या हाडांची वाढ ही एक ते तीन वर्षे वयात जास्त होती. चार ते सहा वयोगटात ती कमी होती व नंतरच्या काळात पायांच्या हाडांची वाढ वेगात होते. नेचर कम्युनिकेशन या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिध्द करण्यात आला आहे.
या संशोधनातून डायनॉसॉरची उत्क्रांती कशी होत गेली यावर नवीन प्रकाश पडणार आहे असे ब्रिस्टल विद्यापीठातील प्रा. माइक बेंटन यांनी सांगितले.