रेस अक्रॉस अमेरिका (रॅम) ही जगातील सर्वात कठीण सायकल शर्यत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात नाशिकचे महेंद्र व हितेंद्र महाजन हे डॉक्टर बंधू यशस्वी ठरले आहेत. महाजन बंधूंनी आठ दिवस १४ तास आणि ५५ मिनिटांत ही शर्यत पूर्ण केली.

‘रेस अक्रॉस अमेरिका’ आयोजित स्पर्धेत हे दोघे बंधू सहभागी झाले होते. ४,८०० किमी अंतर असणा-या त्यांच्या या शर्यतीला मेरीलँड अटलांटिक कोस्ट मधून सुरुवात झाली व त्यांच्या वाटेत कॅलिफोर्नियातील जंगल, मोजावे येथील वाळवंट व कोलोरॅडो येथील उंच पर्वतरांगा आणि मध्य अमेरिकेतील वारे यांचा अडथळा होता. या सर्व अडथळ्यांवर मात करत त्यांनी ही शर्यत पूर्व किनारपट्टीवरील अप्पालाचेन पर्वतरांगांमध्ये संपवली असल्याचे रेस अक्रोस अमेरिकेच्या संकेतस्थळावर सांगण्यात आले आहे.

३९ वर्षाचे डॉ. हितेंद्र हे व्यवसायाने दंत चिकित्सक आहेत तर त्यांचे ४४ वर्षीय बंधू डॉ. महेंद्र हे भूलतज्ञ आहेत. रेस अक्रोस अमेरिकेच्या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी ही शर्यत २३.३६ किमी प्रती तास इतक्या वेगाने सायकल चालवत पूर्ण केली. यापूर्वी स्पर्धेतील सोलो म्हणजेच एकट्याने सहभागी होण्याच्या यादीमध्ये बंगळुरू येथील शमीम रिझवी व अलीबाग येथील सुमित पाटील हे सहभागी झाले होते. पण ते ही शर्यत पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे ही शर्यत पूर्ण करण्याचा प्रथम भारतीयांचा मान महाजन बंधूंना मिळाला आहे.
‘टुर-दी-फ्रान्स’प्रमाणे ‘रेस अक्रॉस अमेरिका’ ही शर्यत अनेक दिवस चालणरी असून या शर्यतीमध्ये स्पर्धकांना सलग सायकल चालवावी लागते. स्पर्धकांच्या शारिरीक व मानसिक क्षमतेची कठोर परीक्षा घेणारी ही शर्यत जगातील सर्वात कठीण सायकल स्पर्धा समजली जाते.