भारतीय जनता पक्षाने अद्याप आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित केलेला नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्याची घाई कोणीही करू नये, असे पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी सोमवारी स्पष्ट केले.
भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, याचा निर्णय पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये घेतला जाईल. पक्षसदस्यांनी याबाबतच्या प्रश्नाचे उत्तर संसदीय मंडळावर सोपवावे, असे राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. भाजपमधील काही नेते गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारीबद्दल आपली मते व्यक्त करीत आहेत. त्यापार्श्वभूमीवर राजनाथसिंह यांनी वरील वक्तव्य केले.
पुढील वर्षी होणाऱया लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदी यांचे नाव जाहीर करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. मोदी यांनाच पंतप्रधानपदाची उमेदवारी द्यावी, यासाठी काही हिंदूत्त्ववादी संघटनाही सक्रिय झाल्या आहेत. मात्र, राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाचा मोदी यांच्या उमेदवारीला विरोध आहे. जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडेही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून बघितले जाते आहे.