राष्ट्रीय औषध दर धोरण योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली. या निर्णयामुळे ३४८ जीवनवाश्यक औषधांच्या किंमती नियंत्रणात राहणार आहे. यापूर्वी ७४ जीवनावश्यक औषधांचा या योजनेत समावेश होता, मात्र आता ही यादी वाढविण्यात आल्याने सर्वसामान्यांना ही औषधे माफक किंमतीमध्ये मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.
 ज्या औषधांचा बाजारपेठेतील हिस्सा १ टक्यांपेक्षा जास्त आहे, अशा औषधांच्या किंमतीच्या सरासरीच्या आधारे या सर्व औषधांचे दर निश्चित केले जातील अशी माहिती या सूत्रांनी दिली. जीवनावश्यक औषधांच्या धोरणाबाबत २७ नोव्हेंबपर्यंत योजना सादर करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले होते.
पायाभूत क्षेत्राच्या विकासाला गती..
देशातील पायाभूत क्षेत्राच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी रेल्वे मार्गाच्या उभारणीत खासगी सहभागाबरोबरच, देशातील एक लाख ५५ हजार टपाल कार्यालयांचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णयही घेतला. तेल आयातीची क्षमता वाढविण्याच्यादृष्टीने कांडला बंदरातील अतिरिक्त सोयीसुविधांचा विकास करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला.